Sunetra Pawar Deputy CM : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. आता त्यांच्यावर सोपवण्यात आलेले खाते, उपमुख्यमंत्री पद कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान कोणत्या विषयावर चर्चा रंगली याबाबतची माहिती प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे द्यायचं
महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादन शुल्क, क्रीडा हे खाते सोपवण्यात आले होते. यामुळे आता त्यांच्या नंतर या खात्यांचा कारभार नेमका कोणाकडे द्यायचा आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे द्यायचं याची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे CID ला दिले आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास
पक्षातील आमदारांसोबत बोलून आम्ही निर्णय घेणार
आज प्राथमिक चर्चा झाली. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा असल्याचं आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. पक्षातील आमदारांसोबत बोलून आम्ही निर्णय घेणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केलेली नाही. कोणाला उपमुख्यमंत्री पदावर बसवायचं हे आमदारांशी बोलून निर्णय घेण्यात येणार आहे. सगळ्यांच्या भावना समजून घेऊन याबाबत आम्ही निर्णय घेऊ अशी माहिती प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आजच्या बैठकीत अंतर्गत चर्चा
अजूनही राजकीय शोक आहे. घरचे कार्यक्रम सुरु आहे. किमान घरचे सर्व कामे आटपून रात्री किंवा उद्या आम्ही चर्चा करणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आम्ही केलेली नाही. आजच्या बैठकीत अंतर्गत चर्चा केली आहे. आम्ही जनभावनेचा, आमदारांचा आमची स्वतःची भावना आहे कि, योग्य निर्णय घेतला पाहिजे. लवकरच आम्ही ही जागा भरू, लवकरच योग्य निर्णय होईल, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
पवार कुटुंबीय एकत्र बसून एकत्रीकरणाचा निर्णय घेणार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेणार असून लवकरच ही चर्चा पार पडेल. परंतु अंतिम निर्णय शरद पवार घेतील. पक्ष एकत्रीकरणाच्या आधीच्या चर्चांमध्ये शरद पवार, अजित पवार सुप्रिया सुळे, जयंत पाटील अमोल कोल्हे शशिकांत शिंदे सहभागी होते. परंतु आता अजित पवार हयात नसल्याने पवार कुटुंबीय एकत्र बसून एकत्रीकरणाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.












