The youngest mayor in the state : बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या नवख्या शिलेदाराने मैदान मारल्याचं समोर आलं आहे. प्रस्तावित उमेदवाराने निवडणूक काळात पक्षांतर केल्याने शरद पवार गटाकडे उमेदवारी कोणाला द्यावी असा प्रश्न पडला होता. पुढच्या तगड्या उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार मिळला नाही. म्हणून अवघ्या २१ वर्षीय नवख्या तरुणाला उमेदवारी दिली आणि त्याने त्याचं सोनं केलं. सौरभ तायडे असे या उच्चशिक्षित तरुणाचे नाव आहे. त्याने रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वात तरुण वयाचा नगराध्यक्ष होण्याचा मान त्याला मिळवला आहे.
विशेष म्हणजे शिक्षण घेत असलेल्या सोरभ तायडेची परवा २४ डिसेंबर रोजी शिक्षणशास्त्र पदव्युत्तर परीक्षेचा पेपर आहे. सिंदखेडराजा नगरीत तरुणांसाठी विशेष कार्य करायचंय, अशी भावना सौरभ तायडेची आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत राज्यातील सर्वात कमी वयाचे तरुण नगराध्यक्ष सौरभ तायडे यच्या या यशाने राज्यातील उच्चशिक्षित तरुणांनीही राजकारणात येऊन देशसेवा आणि राज्याचा विकारा करावा, अशी लोकभावना आता समाजातून उमटत आहे.
राजकारणात आला अन् पहिल्याच निवडणूकीत विजयी झाला
घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सौरभ तायडे राजकारणात आला अन् पहिल्याच निवडणूकीत विजयश्री खेचून आणत सर्व रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. सर्वात तरुण उच्चशिक्षित नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांचा नावावर झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व वयोवृद्ध नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सौरभ तायडेवर विश्वास ठेवून त्याला उमेदवारी दिली आणि एक इतिहासच घडवला. ऐतिहासिक व पुरातन असलेल्या शिंदखेडराजा नगरीचा प्रथम नागरिक बनल्यानंतर सौरभला आता सिंदखेड राजा शहराचा विकास करायचा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिदि यांची प्रचार सभा
विरोधात अनुभवी व धनाढ्य उमेदवार असूनही अतिशय आत्मविश्वासाने ही निवडणूक लढलो व जिंकलो, अशी भावना सौरभची आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सिंदखेडराजा शहरात दोन्ही राष्ट्रवादीसह शिंदे यांची शिवसेना आमने-सामने होती. सिंदखेडराजा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदि यांची प्रचार सभा ही झाली होती. याउलट शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची कुठलीही सभा वा नेता प्रचाराला सिंदखेडराजा नगरीत आलेले नव्हते. मात्र तरीही सौरभ तायडे यांनी बाजी मारत एक इतिहास घडवला आहे.
22 वर्षीय तरुणीने भाजपला दिला धक्का
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मोहोळ नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेना उमेदवार सिद्धी वस्त्रे या विजयी झाल्या असून त्यांनी भाजपा उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा पराभव केला आहे. मोहोळमध्ये झालेल्या निवडणुकीत मोहोळ नगरपरिषदेच्या २० पैकी नऊ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. शिंदेसेनेचा हा विजय भाजपामध्ये अस्वस्थता वाढवणारा आहे. विशेष म्हणजे सिद्धी वस्त्रे या २२ वर्षांच्या असून त्यांच्याकडे सर्वात तरुण उमेदवार म्हणून पाहिले जात होते. त्यांनी १७० मतांनी भाजपाच्या शीतल क्षीरसागर यांचा पराभव केला आहे.












