Humayun Kabir New Political Party : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं नवीन बाबरी मशिदीची पायाभरणी करणारे हुमायून कबीर यांनी त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी त्याचं नाव जनता उन्नयन पक्ष असं ठेवलं आहे. पक्षाचं नाव आणि ध्वज अंतिम करण्यासोबतच, कबीर यांनी अनेक मतदारसंघांसाठी उमेदवारही निश्चित केले आहेत. त्यांनी स्वतः दोन मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी इतर दोन मतदारसंघांसाठी हुमायून कबीर नावाच्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींना तिकीट दिलं आहे.
कोणाला दिलं तिकिट :
नवीन पक्षाचं नाव जाहीर केल्यानंतर, हुमायून कबीर यांनी सांगितलं की ते मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजी नगर आणि भरतपूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. ते नवीन पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी हाजी इम्रान हुसेन ग्रामीण खरगपूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी घोषणाही केली. हुमायून कबीर यांना भगवानगोला मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. ही व्यक्ती वेगळी आहे, पण नाव एकच आहे. डॉ. हुमायून कबीर यांना राणी नगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. ही व्यक्तीही वेगळी आहे. एकूण, जनता उन्नयन पक्षानं हुमायून कबीर यांना चार जागांसाठी उमेदवारी दिली आहे.
#UPDATE | Murshidabad, West Bengal: Suspended TMC MLA Humayun Kabir launched a new party today, ‘Janata Unnayan Party’ https://t.co/SW26AeHouP
— ANI (@ANI) December 22, 2025
जनता उन्नयन पक्षाचे इतर उमेदवार
दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील हरिरामपूर विधानसभा मतदारसंघातून वहिदुर रहमान.
मनीषा पांडे मुर्शिदाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
मुश्केरा बीबी बोईसनब नगर मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
हे ही वाचा :माणिकराव कोकाटेंना ‘सर्वोच्च’ दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती
ओवैसींसोबत युती करण्याची योजना :
हुमायून कबीर यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की ते पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवतील आणि असदुद्दीन ओवैसींच्या पक्षासोबत, एआयएमआयएमशी युती करतील. कबीर यापूर्वी टीएमसीच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांनी एक नवीन पक्ष स्थापन केला आहे. टीएमसीमध्ये सामील होण्यापूर्वी ते काँग्रेस आणि भाजपाचे सदस्य होते. राजकारणात येण्यापूर्वी ते नागरी सेवेत होते.












