Shraddha Kapoor Eetha Movie Explainer: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘ईठा’ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असताना, आता चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला आहे.
अंगावर जरतारी नऊवारी साडी, कपाळावर लाल भडक कुंकू, नाकात नथ, डोळ्यात काजळाची धार, गळ्यात कोल्हापुरी साज, बाहूवर कडे अन् पायात घुंगरांचा खणखणाट.. गालावर मोकळी सुटलेली काळीभोर बट, कमरेला कसलेला शेला, अन् ढोलकीच्या थापेवर तालासुरात खणखण राडा घालत आपल्या एकेक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत ती स्टेजवर येते…
सध्या महाराष्ट्राच्या चित्रपटाच्या फडात एकच चर्चा रंगलीये बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या नव्याकोऱ्या, खणखणीत ईठा या सिनेमाची. सिनेमाचा अंगावर काटा आणणारा टीझर काय बाहेर पडला, साऱ्या महाराष्ट्राची नजर मोठ्या पडद्याकडे लागलीये. श्रद्धा कपूर नऊवारी साडी नेसून, नाकात नथ घालून आणि पायात घुंगर घालून तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या अवतारात उभी राहिलेली दिसली.
तिची ती अदा, तिचा तो अभिनय पाहून रसिक म्हणायला लागले व्वा पोरीन विठाबाईंचा आत्माच पडद्यावर आणला की काय…पण सुख आणि दुःख हे तमाशाच्या रात्रीसारखं असतं, कधी संपेल सांगता येत नाही. टीझर गाजतोय खरा, पण अवघ्या चोवीस तासांत हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय…
हेही वाचा: लस टोचली चक्कर आली अन् खेळ संपला! श्रावणी सोबत नेमकं काय घडलं? पाहा
Shraddha Kapoor Eetha Movie :
वादाची ठिणगी कुठे पडली?
हा वाद कुठल्या गाण्यावर नाही, वाद श्रद्धाच्या नृत्यावर नाही, तर वाद सिनेमाच्या नावावर पेटलाय….ज्या माऊलीने महाराष्ट्राच्या लोककलेला, तमाशाच्या फडाला आणि लावणीला दिल्लीच्या तख्तापर्यंत नेऊन पोहोचवलं, ज्या वाघिणीने गरोदर असताना स्टेजवर नाचता नाचता विंगेत जाऊन बाळाला जन्म दिला आणि सुरी, कात्री नसल्यामुळे स्वतःच्या हाताने बाळाची नाळ दगडाने ठेचली आणि त्याच रक्ताच्या थारोळ्यात पुन्हा पायात घुंगरं बांधून स्टेजवर उभी थकली..
श्रद्धा कपूरच्या सिनेमाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला
त्या लावणीसम्राज्ञीचं नाव या बॉलिवूडच्या दिग्दर्शकांनी काय ठेवलंय माहितीये का? त्यांनी नाव ठेवलंय ईठा… (Shraddha Kapoor Eetha Movie Explainer) अन इथंच महाराष्ट्राच्या काळजाला आग लागलीये.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याचित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं श्रद्धा कपूरच्या सिनेमाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला आहे.. बाबासाहेब पाटील यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना सांगितलं आहे कि हा विठाबाई नारायणगावकर यांचा अपमान आहे.. नाव त्वरित बदला अन विठाबाई किंवा विठा करा..
‘ईठा’ नावावर दोन मतप्रवाह
हा वाद एवढ्यावरच संपत नाही. राजकीय पुढारी एका बाजूला ओरडत असताना, सोशल मीडियाच्या फडात नेटकऱ्यांनी आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या खऱ्या चाहत्यांनी वेगळीच ढोलकी वाजवायला सुरुवात केलीये… चाहत्यांचं म्हणणं हाय की, अरे बाबांनो, राजकारण जरा बाजूला ठेवा, आमच्या गावाकडच्या साध्या भोळ्या मातीत विठाबाईंना प्रेमानं आणि आदराने ईठाबाई किंवा ईठाच हाक मारली जायची. त्यामुळे हे नाव मातीचा सुवास देतंय, अपमान करत नाही…. आता एकीकडे ऐतिहासिक सन्मानाची तलवार उपसलीये, तर दुसरीकडे गावाकडच्या अस्सल बोलीभाषेची ढाल पुढे केलीये. काय हाय हा संपूर्ण राडा? कसा रंगलाय हा अस्मितेचा तमाशा? (Shraddha Kapoor Eetha Movie Explainer)
विठाबाई नारायणगावकर यांचे योगदान
महाराष्ट्राची लोककला, तमाशाचा फड आणि लावणीची थिरकणारी पावलं… ही नुसती कला नाही, तर हा महाराष्ट्राचा श्वास आहे. आणि याच श्वासाला जागतिक स्तरावर अभिमानाने मिरवायला लावणारे नाव म्हणजे लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर…. ज्या काळात बायकांनी घराबाहेर पडणे पाप मानले जायचे, त्या काळात विठाबाईंनी तमाशाचा फड सांभाळला, गाजवला आणि देशाच्या राष्ट्रपतींकडून मानाचा पुरस्कारही पटकावला. त्यांच्या याच अंगावर शहारे आणणाऱ्या आयुष्यावर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि मॅडॉक फिल्म्सचे निर्माते दिनेश विजान घेऊन येत आहेत एक भव्य चरित्रपट, ज्याचे नाव ठेवण्यात आले आहे ईठा. या चित्रपटाचा टीझर जाहीर झाला.
श्रद्धा कपूर
या भूमिकेत श्रद्धा कपूरने स्वतःला पूर्णपणे झोकून दिल्याचे दिसतय. पोटात बाळ असतानाही ती स्टेजवर जाते, रसिकांना मुजरा करते. पण कळा एवढ्या वाढतात कि ति विंगेत जाते. तिथे एका गोड मुलीला जन्म देते. बाहेर प्रेक्षक ओरडत आहेत. अशा वेळी ही वाघीण बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलते आणि स्वतःच्या बाळाची नाळ त्या दगडाने ठेचून मोकळी होते.. अंगावरची साडी घट्ट आवळते, पायातले घुंगर पुन्हा बांधते आणि रक्ताच्या पावलांनी पुन्हा स्टेजवर येऊन नाचू लागते.. हा थरार जेव्हा प्रेक्षकांनी टीझरमध्ये पाहिला, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नाही. श्रद्धा कपूरच्या या अनपेक्षित आणि वादळी रूपाने चाहत्यांना भुरळ पाडली. पण हा कौतुकाचा सोहळा सुरू असतानाच, या सिनेमाला वादाची मोठी फोडणी बसली.
चित्रपटाच्या टीझरचे कौतुक
चित्रपटाच्या टीझरचे कौतुक सर्वत्र होत असले, तरी या चित्रपटाचे शीर्षक म्हणजेच ईठा हे नाव महाराष्ट्रातील अनेक संघटनांच्या आणि राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खुपले आहे. चित्रपट रिलीज व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने या नावावर आक्षेप नोंदवला आहे.
विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अधिकृत पत्रक प्रसिद्ध करत निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिला आहे. बाबासाहेब पाटील यांच्या मते, विठाबाई नारायणगावकर या केवळ एक कलाकार नव्हत्या, तर त्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा मानबिंदू होत्या. त्यांना देशाच्या राष्ट्रपतींनी सन्मानित केले आहे. अशा महान राष्ट्रीय कलाकाराच्या जीवनावरील चित्रपटाचे नाव ईठा असे ठेवणे कोणत्याही दृष्टीने योग्य वाटत नाही. ईठा हे नाव सन्मानजनक वाटत नाही आणि यामुळे महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये विठाबाईंच्या खऱ्या नावाबाबत मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो.
बाबासाहेब पाटील यांनी पत्रात स्पष्ट म्हटले
बाबासाहेब पाटील यांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, विठाबाईंचा इतिहास आणि त्यांचा संघर्ष पडद्यावर येणे ही देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण हा इतिहास मांडताना मूळ नावाचा आदर राखला गेला पाहिजे. सिनेमेकर्सनी चित्रपटाचे शीर्षक बदलून ते विठा किंवा विठाबाई असे करावे, जेणेकरून जनतेला त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटेल आणि त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा योग्य सन्मान राखला जाईल. या मागणीमुळे आता पुण्यापासून मुंबईपर्यंत राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण चांगलेच तापले आहे.
चित्रपटाचा टीझर रिलीज
चित्रपटाचा टीझर रिलीज होऊन २४ तास उलटत नाही तोच सुरू झालेल्या या वादाने आता मॅडॉक फिल्म्स आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे टेन्शन नक्कीच वाढवले आहे. लक्ष्मण उतेकर यांनी यापूर्वी मीमी आणि झाला गाजावाजा सारख्या चित्रपटांमधून आपल्या दिग्दर्शनाची चुणूक दाखवली आहे. ते स्वतः महाराष्ट्राच्या मातीतील असल्याने त्यांना ग्रामीण संस्कृतीची जाण आहे. म्हणूनच त्यांनी स्थानिक भाषेचा लहेजा पकडण्यासाठी ईठा हे नाव निवडले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटामध्ये केवळ श्रद्धा कपूरच नाही, तर रणदीप हुड्डा, नाना पाटेकर आणि मोहम्मद झीशान अय्यूब यांसारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Shraddha Kapoor Eetha Movie Explainer)
तसेच चित्रपटाला महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय अतुल यांचे अस्सल संगीत लाभले आहे. २८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे रिलीज अगदी तोंडावर आले असताना हा वाद वाढण्याची शक्यता आहे, सोशल मीडियावरील युजर्सचे समर्थन आणि राजकीय नेत्यांचा वाढता दबाव या दोन्ही गोष्टींचा विचार करून, मेकर्स चित्रपटाच्या नावात बदल करणार का? ईठाचे शीर्षक बदलून विठाबाई किंवा विठा असे केले जाणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: थिएटरनंतर OTTवर ‘राजा शिवाजी’चा जलवा; कुठे पाहाल हा ब्लॉकबस्टर चित्रपट?
ऐतिहासिक अस्मिता आणि नावाचा सन्मान
एका बाजूला आहे ऐतिहासिक अस्मिता आणि नावाचा सन्मान, तर दुसऱ्या बाजूला आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीची साधी भोळी, अस्सल बोलीभाषा… दोन्ही बाजूंचे तर्क आपापल्या जागी अगदी खणखणीत नाण्यासारखे खरे आहेत. पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी साफ हाय.. विठाबाई नारायणगावकर यांनी ज्या कलेसाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, स्वतःच्या पोटाच्या गोळ्याची नाळ दगडाने ठेचून ज्या बोर्डाची अब्रू राखली, त्या माऊलीचा इतिहास जगासमोर येणं खूप गरजेचं आहे. श्रद्धा कपूरने घेतलेली मेहनत वाया जाता कामा नये, पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या या लावणीसम्राज्ञीच्या नावाचा अवमान किंवा इतिहास पुसला जाण्याचा धोकाही निर्माण होता कामा नये.
आता या जनमानसातील खदखद आणि राजकीय दबावानंतर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि मॅडॉक फिल्म्स काय सुवर्णमध्य काढतात? ईठा हेच नाव कायम राहतंय की लोकांच्या मागणीचा आदर ठेवून पडद्यावर मोठ्या अक्षरात विठाबाई असं नाव झळकतंय? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल.












