IND vs UAE Hong Kong Sixes 2026: हॉंगकॉंग सिक्सर्स स्पर्धेत भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानकडून पराभव स्वीकारल्यानंतर आता यूएईनेही टीप इंडियाला धूळ चारली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय खेळाडू अपयशी ठरले. अवघ्या ४.२ षटकांत युएईने विजय मिळवत भारतीय संघाला मोठा धक्का दिला.
India vs UAE Result: हाँगकाँग सिक्सर्स स्पर्धेत भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, सलग दोन सामन्यांमधील पराभवामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकांत 94 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात युएईच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत अवघ्या 26 चेंडूंत विजय मिळवला.
भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी
नाणेफेकीनंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आघाडीच्या फलंदाजांकडून अपेक्षित योगदान मिळाले नाही. नितीश राणा, राहुल त्रिपाठी, राहुल तेवतिया आणि शशांक सिंग यांना प्रभाव पाडता आला नाही.
नितीश राणाने अवघ्या 6 धावा केल्या, तर राहुल तेवतिया आणि शशांक सिंग यांना प्रत्येकी एक धाव करता आली. त्यामुळे भारतीय डाव अडचणीत सापडला. अखेर टी. नटराजनने आक्रमक फलंदाजी करत 14 चेंडूंत 38 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीमुळे भारताला 94 धावांपर्यंत पोहोचता आले.
युएईच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल
95 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. भारतीय गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले. खालिद शाहने विशेष आक्रमक फलंदाजी करत भारताच्या गोलंदाजीची लयच बिघडवली.
पहिल्याच षटकात टी. नटराजनच्या गोलंदाजीवर खालिद शाहने 25 धावा वसूल केल्या. यामुळे युएईला सुरुवातीलाच मोठी आघाडी मिळाली.
दुसऱ्या षटकात शशांक सिंगने गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली. सुरुवातीच्या तीन चेंडूंमध्ये दोन षटकारांसह 16 धावा दिल्यानंतर त्याने पुढील तीन चेंडूंवर एकही धाव दिली नाही. त्यामुळे काही प्रमाणात धावगतीला लगाम बसला.
नितीश राणाच्या षटकात पुन्हा धावांचा पाऊस
दुसऱ्या षटकात शशांक सिंगने केलेल्या पुनरागमनानंतर भारतीय संघाला सामन्यात परतण्याची संधी होती. मात्र, तिसऱ्या षटकात नितीश राणाच्या गोलंदाजीवर युएईच्या फलंदाजांनी पुन्हा आक्रमण केले. या षटकात तब्बल 24 धावा निघाल्याने भारतीय संघावरील दबाव वाढला.
यानंतर चौथ्या षटकात टी. नटराजन गोलंदाजीसाठी आला. मात्र, त्यालाही युएईच्या फलंदाजांना रोखता आले नाही. त्याच्या षटकात 19 धावा निघाल्या आणि भारताच्या हातातून सामना जवळपास निसटला.
कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर षटकारांचा वर्षाव
पहिल्या सामन्यातही भारतीय गोलंदाजीची मोठी परीक्षा झाली होती. पाकिस्तानविरुद्ध कृणाल पांड्याच्या एका षटकात सलग पाच षटकार मारण्यात आले होते. युएईविरुद्धही त्याला दिलासा मिळाला नाही.
कृणाल गोलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर खालिद शाहने त्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकले. यामुळे युएईने अवघ्या 4.2 षटकांत लक्ष्य गाठत सहा गडी राखून विजय मिळवला.
हेही वाचा: Mumbai AI Camera : आता रस्त्यावर कचरा टाकला तर AI कॅमेरा देणार इशारा; मुंबई महापालिकेचा नवा प्रयोग
पाकिस्ताननंतर युएईकडूनही पराभव
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर युएईविरुद्धही भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. फलंदाजांकडून मोठी खेळी झाली नाही आणि गोलंदाजांनाही प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करता आला नाही. त्यामुळे हाँगकाँग सिक्सर्स स्पर्धेतील भारताची मोहीम संपुष्टात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका होत असून आगामी स्पर्धांमध्ये खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत सुधारणा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.









