मुंबई PBKS Beat MI : आयपीएल 2026 चा 24वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात झाला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला, ज्यात पंजाब किंग्सनं सात गडी राखून एकतर्फी विजय मिळवला (PBKS Won). हा पंजाबचा या हंगामातील चौथा विजय होता, तर मुंबई इंडियन्सला सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या विजयामुळं पंजाब नऊ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
हेही वाचा : विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक, मेंदूत रक्ताची गुठळी आणि पक्षाघाताचा धोका; सचिनची आपल्या मित्राला मदत
डी कॉकचं शतक व्यर्थ :
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना, मुंबई इंडियन्सनं 20 षटकांत सहा गडी गमावून 195 धावा केल्या. मुंबईकडून डी कॉकनं शतक झळकावत एक शानदार खेळी केली. नमन धीरनंही अर्धशतक झळकावलं. डी कॉक 60 चेंडूंमध्ये 112 धावांवर नाबाद राहिला. आपल्या खेळीत त्यानं 8 चौकार आणि 7 षटकार मारले. नमन धीर 31 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीनं 50 धावा करुन बाद झाला. पंजाबच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास, अर्शदीप सिंगनं 4 षटकांत 22 धावा देऊन 3 बळी घेतले.
पंजाबचा सहज विजय :
प्रत्युत्तरात पंजाब किंग्सनं हे लक्ष्य 16.3 षटकांत सहज गाठलं. या सामन्यात पंजाब किंग्ससाठी प्रभसिमरन सिंगनं सामना जिंकून देणारी खेळी केली. श्रेयस अय्यरनंही अर्धशतक झळकावलं. अय्यर 35 चेंडूंमध्ये 66 धावा करून बाद झाला. या सामन्यात प्रभसिमरननं 39 चेंडूंमध्ये नाबाद 80 धावांची खेळी केली, ज्या दरम्यान त्यानं 8 चौकार आणि 7 षटकार मारले.












