Ireland Beat Oman : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये आयर्लंड आणि ओमान यांच्यातील सामना कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब इथं खेळवण्यात आला. यात आयर्लंडनं ओमानचा 96 धावांनी पराभव केला. ओमाननं नाणेफेक जिंकली आणि त्यांचा कर्णधार जतिंदर सिंगनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं 20 षटकांत 5 गडी गमावून 235 धावा केल्या. या विश्वचषकातील ही सर्वोच्च धावसंख्या आणि टी-20 विश्वचषक इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. आयर्लंडचा कर्णधार लोर्कन टकर 94 धावांवर नाबाद राहिला आणि शतकापासून सहा धावा कमी पडल्या. प्रत्युत्तरात ओमान संघ 18 षटकांत 139 धावांवरच सर्वबाद झाला.
खराब सुरुवातीनंतर मोठी खेळी :
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांचे टॉप-ऑर्डर फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. टिम टेक्टर 5, रॉस अडायर आणि हॅरी टेक्टर 14 धावांवर बाद झाले. आयर्लंडनं 64 धावांवर चार गडी गमावले. त्यानंतर गॅरेथ डेलानी आणि कर्णधार लोर्कन टकर यांनी पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. जॉर्ज डॉकरेल आणि लॉर्कन टकर यांनी सहाव्या विकेटसाठी 19 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. लॉर्कन टकर 51 चेंडूत 94 धावांवर नाबाद राहिला. तर जॉर्ज डॉकरेलनं 9 चेंडूत 35 धावांचा तडाखा दिला.
ओमानचे फलंदाज सपशेल अपयशी :
ओमानची सुरुवातही चांगली झाली नाही. जतिंदर सिंग 21 धावांवर बाद झाला, त्यानं 5 चेंडूत 7 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा आशिष ओडेदरा 1 धावावर बाद झाला. अमीर कलीम आणि हम्माद मिर्झा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली, परंतु ही भागीदारी तुटल्यानंतर ओमानचा डाव डळमळीत झाला. अमीर कलीमनं ओमानसाठी एकमेव अर्धशतक झळकावलं, त्यानं 29 चेंडूत 50 धावा केल्या. हम्माद मिर्झा यानंही 46 धावा केल्या. मात्र हे संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आयर्लंडकडून जोशुआ लिटलनं सर्वाधिक तीन बळी घेतले.












