Samruddhi Mahamarg Bus Accident | आजकाल लोकांना सोशल मीडियाचा एवढा नाद लागला आहे की त्यांना कोणत्याही गोष्टीचे भान राहिलेले नाहीये. सोशल मीडियावर रिल्स (Reels) बनवण्याचा सध्या ट्रेंडच निघाला आहे. तर हे रिल्स बनवणं आजकाल बऱ्याच लोकांना महागात पडताना दिसत आहे. रिल्सच्या नादात बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आताही रिल्स बनवण्याच्या नादात एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला असून यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून 25 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा – “पंतप्रधान मोदी वारंवार खोटं बोलत आहेत”, नाना पटोलेंची खोचक टीका, म्हणाले, ते फेकू आहेत…
रिल्स बनवणं पडलं महागात, खासगी बसचा भीषण अपघात
समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ड्रायव्हर आणि क्लिनर रिल्स बनवत असताना गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि मेहकर येथील टोलनाक्याजवळ बस पटली होऊन अपघात घडला. या अपघाताने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
बसचा चालक आणि क्लिनर चालत्या गाडीत मोबाईलवर रिल्स बनवत होते. ड्रायव्हर गाडी चालवत चालवत कॉलर वर करून नाचत होता. तर समोर टोलनाका आल्यानंतर त्याने अचानक गाडी वळवल्याने बस थेट पलटी झाली. रिल्स बनवण्याच्या नादात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटून एका चारचाकी वाहनावर जाऊन आदळली. या धडकेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
रिल्स बनवत चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह देखील निर्माण केले जात आहे. तर या अपघातानंतर तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. सध्या या अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.












