Raigad Fort Dress Code : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ड्रेस कोडबाबत सुरू झालेली चर्चा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रायगडासह शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांनी योग्य आणि मर्यादित पोशाख परिधान करावा(Shivaji Maharaj Fort Dress Code), तसेच छोटे कपडे घालण्यावर निर्बंध असावेत, अशी मागणी पुढे आली आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून अधिकृत ड्रेस कोड लागू झाल्याची घोषणा अद्याप झालेली नाही.
रायगडावर ड्रेस कोडची चर्चा का सुरू झाली? (Raigad Fort Dress Code)
रायगड किल्ल्यावर नुकत्याच झालेल्या दीपोत्सवादरम्यान एका लहान मुलीने जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्याकडे पर्यटकांच्या पेहरावाबाबत विनंती केली होती. गडावर येताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक स्थळाचा सन्मान राखला जावा आणि छोटे कपडे घालणे टाळावे, अशी तिची भूमिका होती.
या विनंतीनंतर विकास गोगावले यांनी या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे रायगडावरील ड्रेस कोडचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मराठा महासंघाचाही गड-किल्ल्यांवर ड्रेस कोडचा ठराव
दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नागपूर येथे झालेल्या १२६ व्या वार्षिक आमसभेतही गड-किल्ल्यांवरील पर्यटकांच्या पेहरावाबाबत महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक गड-किल्ले आणि शिवतीर्थांचे पावित्र्य व ऐतिहासिक प्रतिष्ठा जपण्यासाठी तेथे येणाऱ्या महिला, युवती आणि पुरुषांनी योग्य पोशाख परिधान करावा, अशी भूमिका या ठरावातून मांडण्यात आली (Raigad Fort Visitor Rules). छोटे आणि अनुचित कपडे परिधान करण्यावर निर्बंध असावेत, अशी मागणीही करण्यात आली. हा ठराव महासंघाच्या आमसभेत मंजूर झाला असला, तरी तो सरकारचा अधिकृत आदेश नाही.
हेही वाचा : फुलवराच्या नायिकांची हुतात्मा स्मारकाला मानवंदना; वैदेही-प्रियदर्शिनीचा लावणीसाज चर्चेत!
रायगडावर ड्रेस कोड लागू झाला आहे का?
सध्या उपलब्ध माहितीनुसार, रायगड किल्ल्यावर पर्यटकांसाठी (Raigad Fort Tourism) सरकारने अधिकृतपणे ड्रेस कोड लागू केलेला नाही. सध्या या विषयावर मागणी, निवेदन आणि संघटनांच्या ठरावाच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे.
त्यामुळे रायगडावर जाताना विशिष्ट प्रकारचे कपडे घालणे कायद्याने बंधनकारक झाले आहे किंवा ड्रेस कोडचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे, असे म्हणणे सध्या योग्य ठरणार नाही.
ड्रेस कोडच्या मागणीवरून नवा वाद होण्याची शक्यता?
गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज याबाबत अनेकांकडून सहमती व्यक्त केली जाते. मात्र, सार्वजनिक ऐतिहासिक स्थळांवर पर्यटकांच्या कपड्यांवर निर्बंध घालण्याचा अधिकार कोणाला असावा, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि ऐतिहासिक स्थळांचा सन्मान यांचा समतोल कसा राखावा, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.
त्यामुळे रायगडासह राज्यातील इतर गड-किल्ल्यांवर ड्रेस कोड लागू करण्याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता पर्यटकांचे लक्ष लागले आहे.









