Hamza Ali Abbasi Hafiz Saeed: गेल्या अनेक दिवसांपासून भारतात एका पाकिस्तानी वेब सिरीजवरून मोठा वाद सुरु आहे. पाकिस्तानात निर्मित झालेला कोणताही आशय किंवा कंटेन्ट भारतात दाखवला जाणार नाही, अशा सूचना केंद्र सरकारने नेटफ्लिक्सला दिल्या आहेत. त्यामुळे मनोरंजन सृष्टीत अनेक चर्चांना उधाण आले आहे. ‘जो बचे हैं संग समेट लो’ (Jo Bache Hain Sang Samet Lo) नामक वेबसिरीजच्या प्रदर्शनावरून आधीच गोंधळ सुरु असताना आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिरिजमधील अभिनेता हमजा अलीचा (Hamza Ali Abbasi) दहशवाद्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे आधीच सुरु असलेल्या वादाला आता हवा मिळाली आहे.
सरकारचा इशारा आणि प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह
‘जो बचे है संग समेट लो’ या पाकिस्तानी वेब सीरिजच्या प्रदर्शनाविरोधात विविध संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला सक्त निर्देश दिले असून, पाकिस्तानात तयार झालेला आणि पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेला कोणताही मजकूर भारतात दाखवला जाणार नाही, याची खात्री करण्यास सांगितले आहे. या कठोर भूमिकेमुळे सदर वेब सीरिज भारतात प्रदर्शित होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
हाफिज सईदसोबतचा जुना फोटो पुन्हा चर्चेत (Hamza Ali Abbasi Hafiz Saeed)
याच दरम्यान, वेब सीरिजशी संबंधित अभिनेता हमजा अली अब्बासीचा एक जुना फोटो नव्याने समोर आला असून तो सोशल मीडियावर वेगाने फिरत आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद (Hafiz Saeed) याच्यासोबत हमजा अली अब्बासी दिसत असल्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. २०१७ च्या सुमारास एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर मुलाखतीदरम्यान हा फोटो टिपण्यात आल्याचे सांगितले जाते; याबाबतचे वृत्त नामांकित वृत्त वाहिनी इंडिया टुडेने प्रसिद्ध केले आहे.
हेही वाचा : ४ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या फवाद खानच्या सीरिजवर संकट; भारतात पाहता येणार की नाही?
हमजा अली अब्बासीची जुनी पोस्ट काय होती?
व्हायरल होणाऱ्या या फोटोसोबत हमजा अली अब्बासीने (Hamza Ali Abbasi) पूर्वी केलेली एक पोस्टही चर्चेत आहे. त्यात त्याने हाफिज सईदला सर्वात दयाळू, सभ्य आणि नम्र व्यक्ती संबोधत तो धार्मिक सहिष्णुता व मानवतेचा पुरस्कार करत असल्याचा दावा केला होता. तसेच, त्याच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या अपप्रचार व गैरसमजांवर स्पष्टीकरण देण्यासाठी ही मुलाखत घेतल्याचे त्याने पोस्टमध्ये नमूद केले होते.
पाकिस्तानातूनही टीकेचा सूर आणि स्पष्टीकरणाची मागणी
या फोटोवरून वाद पेटल्यानंतर पाकिस्तानचे लेखक मुनीब कादिर यांनीही यावर भाष्य केले आहे. संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी ठरवलेल्या व्यक्तीसोबतच्या छायाचित्रावर हमजा अली अब्बासीने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोण आहे हमजा अली अब्बासी?
हमजा अली अब्बासी हा पाकिस्तानातील एक नावाजलेला अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. त्याने अनेक गाजलेल्या मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, आपल्या अभिनयासोबतच राजकीय आणि धार्मिक विषयांवरील विधानांमुळे तो अनेकदा वादात किंवा चर्चेत राहिला आहे.









