• Home
  • देश
  • व्लादिमीर पुतिन पुढील महिन्यात दोन दिवसीय भारत दौऱ्यावर; राष्ट्रपती मूर्मू आणि पंतप्रधान मोदींची घेणार भेट
Top News

व्लादिमीर पुतिन पुढील महिन्यात दोन दिवसीय भारत दौऱ्यावर; राष्ट्रपती मूर्मू आणि पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Vladimir Putin shaking hands with Indian Prime Minister Narendra Modi during an official meeting

Vladimir Putin India visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 4 आणि 5 डिसेंबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. रशिया हा भारताच्या सर्वात विश्वासू मित्रांपैकी एक आहे. पुतिन यांच्या या भेटीमुळं रशिया आणि भारत यांच्यातील संबंध आणखी मजबूत होतील असं मानलं जातं आहे. या भेटीत तेल खरेदी, संरक्षण आणि व्यापार यासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

या वर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या मॉस्को दौऱ्यादरम्यान पुतिन यांच्या भारत भेटीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी तारखा निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. नंतर पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान भेट झाली.

हे ही वाचा : श्रीलंकेत दित्वा चक्रीवादळामुळं पूर आणि भूस्खलन; 47 जणांचा मृत्यू, 21 जण बेपत्ता

पुतिन यांचा भारत दौरा महत्त्वाचा :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बऱ्याच काळापासून भारतावर रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी दबाव आणत आहेत. पण असं असूनही, भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा भारत दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील. पुतिन यांचा भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरेल. रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादला होता.

 

भारत-रशिया धोरणात्मक संबंध बळकट होणार :

पुतिन यांच्या भेटीमुळं संरक्षण, ऊर्जा, हवामान बदल, अक्षय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रातील अनेक नवीन करार होऊ शकतात. काही जुन्या करारांचं नूतनीकरण देखील शक्य आहे. या भेटीमुळं दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंधच मजबूत होणार नाहीत तर भारताचं भू-राजकीय स्थानही बळकट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये दोनदा रशियाला भेट दिली. ते 22 ऑक्टोबर रोजी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाला गेले होते. त्याआधी मोदी जुलैमध्येही दोन दिवसांसाठी रशियाला गेले होते. त्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts