Breaking News :
ताज्या बातम्या

साईबाबा संस्थानच्या प्रसादाचा भाव वाढला

Shirdi Sai Baba temple prasad price hike

साईबाबांच्या बुंदी लाडू प्रसादाचा भाव 50 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. पूर्वी वीस रुपयांना मिळणारी दोन लाडूची पाकिटे आता तीस रुपयांना मिळणार आहेत.

संस्थानच्या मते, मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरुन काढण्याच्या हेतूने ही दरवाढ केली आहे. जो प्रसाद श्रद्धेने घरी नेला जातो, भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा ‘व्यावसायिक’ दृष्टिकोन ठेवून श्रद्धेच्या प्रतीकातूनच तोटा भरून काढावा का? असा थेट सवाल भाविक करत आहेत.

विशेष म्हणजे, गोरगरिबांना परवडणारे दहा रुपयांचे एक लाडूचे पाकीट आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे पंचवीस रुपयांचे तीन लाडूचे पाकीट बंद करुन संस्थानने केवळ एकच ‘प्रिमियम’ पर्याय ठेवला आहे.

एकीकडे मोफत भोजनाचा आणि माफक दरातील चहा, कॉफी, दूध, नाश्त्याचा कौतुकास्पद उपक्रम व दुसरीकडे प्रसादातून हिशोब जुळवण्याची कसरत, हे गणित काही भाविकांना कळेनासे झाले आहे. बाबांच्या दर्शनानंतर प्रसादाची गोडी आता भाविकांच्या खिशाला परवडणार का ? हाच खरा प्रश्न आहे

तुपाचे दर वाढले आहे, त्यामुळे खर्च वाढणार आहे. लाडू पाकीट विक्रितून जो काही नफा मिळेल, त्यातून दर्शनानंतर दिल्या जाणाऱ्या मोफत बुंदी प्रसादाची काहीशी तूट कमी होण्यास मदत होईल, साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts