• Home
  • राजकारण
  • राज्यात दोन उपमुख्यमंत्री, कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोण करणार पूजा? मंदिर समितीसमोर पेच
महाराष्ट्र

राज्यात दोन उपमुख्यमंत्री, कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोण करणार पूजा? मंदिर समितीसमोर पेच

6 10 5

पंढरपूर : आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री वारी या महत्त्वाच्या चार वारी आहेत. या पैकी महत्त्वाची असणारी दुसरी वारी म्हणजे कार्तिकी एकादशीचा सोहळा. परंपरेनुसार आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होते, तर कार्तिकी एकादशी सोहळ्याची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होते, मात्र, सध्या राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळं कोणाला कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी बोलवायचे? असा प्रश्न विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पुढे निर्माण झाल्यामुळे मंदिर समिती शासनाकडून या संदर्भात मार्गदर्शन मागवणार आहे. रविवारी मंदिर समितीची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली.

कधी आहे कार्तिकी एकादशी? :

कार्तिकी शुद्ध एकादशी रविवार 2 नोव्हेंबर, 2025 रोजी असून, यात्रा कालावधी 22 ऑक्टो. ते 05 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे आठ ते दहा लाख भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात. येणाऱ्या वारकरी,भाविकांना मंदिर समितीकडून आषाढी यात्रेप्रमाणेच आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

बैठकीला मान्यवर उपस्थित :

कार्तिकी यात्रा पूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची बैठक श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे संपन्न झाली. बैठकीस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच पुरातत्व विभागाचे डॉ.विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार तसेच सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पूजा? :

यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी बैठकीत “कार्तिकी एकादशीला राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते श्रींची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. परंतू, राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या मान्यवरांच्या हस्ते पूजा करावी? याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवणे, तसेच 26 ऑक्‍टोंबर ते 09 नोव्हेंबर या कालावधीत 24 तास दर्शन उपलब्ध करून देणे. तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन-संवर्धन कामाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणे, प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यामध्ये मुखदर्शनरांग, प्रशासकीय कार्यालय, अन्नछत्र व इतर अनुषंगीक सोई सुविधा उपलब्ध करून देणेबाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देणे, कम्युनिटी रेडीओ केंद्र स्थापन करण्यासाठी 4 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देणेबाबत शासनास प्रस्ताव देणे, एमटीडीसी भक्तनिवासाचा करारनामा वाढवून घेणेबाबत शासनास प्रस्ताव देणे,” इत्यादी निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts