केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरच्या आमदारांवर गंभीर आरोप करत सांगितले की, मुक्ताईनगरसाठी मंजूर केलेली अनेक महत्त्वाची विकासकामे हेतुपुरस्सर थांबवण्यात आली आहेत आणि यामुळेच त्यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुक्ताईनगरमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्वी मजबूत होता आणि नगरपंचायतही भाजपच्या ताब्यात होती, तरीही माझे वर्चस्व असूनही काही कामे पुढे न गेल्याची मला खंत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुक्ताईनगरमध्ये मुलींची सुरक्षा धोक्यात आहे, माझ्या स्वतःच्या मुलीवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच, अवैध धंदे मुक्ताईनगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असून परिस्थिती खराब होत चालल्याचे त्यांनी नमूद केले. आमदारांना माझ्या कुटुंबाविषयी नेहमीच आक्षेप राहिला आहे, मात्र मी कधीच खडसे कुटुंब आणि आमदार यांच्यातील वादात पडले नाही. मुक्ताईनगरमध्ये आजही भाजपचे अस्तित्व मजबूत असल्याचा दावा करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.






