Gold Jewellery Fraud Gang Busted : सामान्य वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून, भूलथाप देत व हातचलाखी करून अंगावरील सोन्याचे दागिने फसवणुकीने चोरणाऱ्या सराईत टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे या आरोपींकडून सोने विकत घेणाऱ्या सोनाराला ही गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हेही वाचा – हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा अन् आम्हाला शिकवा – राज ठाकरे मोहन भागवतांवर टीकास्त्र
ठाणे, मुंबई व आसपासच्या परिसरात नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली. उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र थोरवे, अशोक थोरवे, योगेश वाघ, प्रकाश पाटिल, रितेश वंजारी, मंगेश जाधव, गणेश गावडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
या कारवाईत रघु प्रकाश राठोड (वय ४८) व संजय दत्ताराम मांगे (वय ५३) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी वृद्ध नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अडवून बोलण्यात गुंतवायचे, त्यांना भ्रमित करून सोन्याच्या चैन, अंगठी व रोख रक्कम हातचलाखीने काढून घ्यायचे, अशी त्यांची पद्धत होती. अटक आरोपीकडून मुद्देमाल घेवून त्याची विल्हेवाट लावण्यात मदत करणारा रामसिंग लालसिंग चौव्हाण याला ही राजस्थान येथील गावातून अटक केली आहे. त्याचे मुंबई मधील वडाळा येथे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आरोपींकडून एकूण सुमारे 130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 16 लाख 59 हजार रुपये आहे. या आरोपींविरोधात बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.












