Greater Noida Family Death : नूडल्स खाऊन झोपले आणि अख्खं कुटुंब सकाळी उठलंच नाही. एकाच घरात पती, पत्नी आणि तीन चिमुरड्यांचे मृतदेह आढळले. महेश, ललिता, लाडू, मिष्टी, साक्षात आणि चंद्रावती हे सहा जन या घरात राहत होते मात्र पाच जणांचा मृत्यू झाला पण घरातली सहावी व्यक्ती मात्र जिवंत होती, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील रबूपुरा परिसरात घडलेली एक अत्यंत थरारक घटना आहे. नेमका हा प्रकार काय आहे? ही अन्नातून झालेली विषबाधा आहे, कि सामूहिक आत्महत्या आहे, की सुनियोजित घातपात आहे?
ग्रेटर नोएडातील रबूपुरा येथे नेमकं काय घडलं? ( Greater Noida Family Death )
शनिवारी सकाळची वेळ, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील रबूपुरा रबूपुरा भागातील एका घरात नेहमीप्रमाणे सकाळी आवराआवर सुरू व्हायला हवी होती. मुलाची शाळेत परीक्षा असल्याने शेजाऱच्या मित्राला वाटलं की कुटुंब लवकर आवरेल. मात्र, सकाळचे आठ वाजले, नऊ वाजले तरी घराचे दार उघडले नाही. शेजाऱ्यांनी दरवाजा खटखटवला, हाका मारल्या, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. अखेर संशय बळावल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आत बेडवर ३७ वर्षांचा महेश, त्याची ३५ वर्षांची पत्नी ललिता, ११ वर्षांचा मुलगा लाडू, ७ वर्षांची मुलगी मिष्टी आणि अवघ्या ३ वर्षांचा साक्षात हे पाचही जण निपचित पडले होते. दरवाजा तोडून जेव्हा लोक आत गेले, तेव्हा पाचही जणांचा श्वास थांबला होता, ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळबळ उडाली. पोलिसांचे पथक तातडीने दाखल झाले.
सुरुवातीला जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा प्राथमिक माहिती अशी समोर आली की या कुटुंबाने आदल्या रात्री साधारण १० वाजण्याच्या सुमारास बाजारातून आणलेले नूडल्स बनवून खाल्ले होते आणि त्यानंतर ते झोपले होते. त्यामुळे पहिल्या काही तासांत हा प्रकार फूड पॉइजनिंग असावा, असा अंदाज वर्तवला गेला. मात्र, जसाजसा तपास पुढे सरकला आणि अन्न सुरक्षा विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले, तसा या कथेला एक वेगळाच आणि धक्कादायक मोड मिळाला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील अन्नपदार्थांचे नमुने आणि नूडल्सच्या पाकिटांची कसून तपासणी केली. अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार कोणत्याही प्रकारे नूडल्स खराब झाल्यामुळे किंवा एक्स्पायरी डेटमुळे झालेल्या फूड पॉइजनिंगचा नाही. याचे कारण असे की, जर अन्नातून सामान्य विषबाधा झाली असती, तर शरीरात ती प्रक्रिया व्हायला वेळ लागतो आणि मृत्यू होण्यापूर्वी उलट्या, जुलाब किंवा पोटात कळा येणे यांसारखी लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत माणूस वाचवण्यासाठी नक्कीच धडपड करतो, ओरडतो, शेजाऱ्यांना हाक मारतो. परंतु, या घटनेत पाचही मृतदेह अतिशय शांत अवस्थेत बेडवर होते, त्यांना प्रतिकार करण्याची किंवा उठण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे हा फूड पॉइजनिंगचा नाही यावर शिक्कामोर्तब झाले.
हेही वाचा : Uttarakhand Film Tourism : मसुरीत अक्षय कुमार, नैनितालमध्ये जाह्नवी कपूर! बॉलिवूडचं आवडतं शूटिंग
मालमत्तेच्या वादाची चर्चा का सुरू झाली? ( Rabupura Family Death Case )
आता प्रश्न असा निर्माण झाला की मृत्यू झाला कसा या प्रश्नाचे उत्तर शोधताना पोलिसांच्या हाती लागले ते या कुटुंबातील अंतर्गत कलह आणि मालमत्तेचा सुरु असलेला वाद, मृत महेश हा आपल्या कुटुंबासह ज्या घरात राहत होता, त्या घरावरून आणि कौटुंबिक संपत्तीवरून त्याचा स्वतःच्या आईशी म्हणजे चंद्रावतीशी आणि विवाहित बहिणींशी वाद सुरू होता. तपासात समोर आले की, महेशच्या वृद्ध आईने तिच्या वाट्याची सर्व जमीन आणि घर महेशच्या नावावर न करता, आपल्या मुलींच्या म्हणजेच महेशच्या बहिणींच्या नावावर केले होते. इतकेच नाही तर महेशला ते घर खाली करण्यासाठी वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. त्या दिवशी हे सगळ कुटुंब जत्रेला गेलं होतं आणि जत्रेतून परतल्यानंतर घरात याच मुद्द्यावरून मोठा वाद झाल्याची माहितीही शेजाऱ्यांनी दिली. या मालमत्तेच्या वादामुळे महेश गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता.
याच पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर तपासाचे दोन मुख्य मार्ग खुले झाले आहेत. पहिला मार्ग आहे सामूहिक आत्महत्येचा. घराची तपासणी केली असता, कुठेही बाहेरील व्यक्तीने जबरदस्तीने प्रवेश केल्याच्या किंवा दरोड्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत. मालमत्तेच्या वादामुळे, हक्काचे घर हिरावून घेतले जात असल्याच्या नैराश्यातून आणि बहिणी-आईकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महेशने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांना आहे. महेशने रात्री नूडल्स आणले आणि स्वतःच्या हाताने त्यात जहाल विष मिसळून ते आपल्या पत्नीला आणि निष्पाप मुलांना खायला दिले असावे आणि त्यानंतर स्वतः चहा किंवा नूडल्समधून ते विष प्राशन करून आपले जीवन संपवले असावे, हा पोलिसांचा पहिला अंदाज आहे.
घरातील सहावी व्यक्ती आणि पोलिसांचा तपास ( Noodles Death Case )
मात्र, या प्रकरणाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट उघड झाली ती म्हणजे घरातील सहावी व्यक्ती. या घरात महेशच्या कुटुंबाव्यतिरिक्त त्याची वृद्ध आईसुद्धा राहत होती. ज्या रात्री हा प्रकार घडला, त्या रात्री ती आई त्याच घरात, दुसऱ्या खोलीत उपस्थित होती. विशेष म्हणजे, संपूर्ण कुटुंब संपले तरी ही सहावी व्यक्ती म्हणजेच महेशची आई सुरक्षित आहे. तिने रात्री ते नूडल्स खाल्ले नव्हते. सकाळी जेव्हा शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला, तेव्हा याच आईने पोलिसांना सांगितले की मुलाने रात्री नूडल्स खाल्ले होते. मी आजारी होते म्हणून मी काही खाल्ल नाही आणि झोपी गेले, आता संशयाची सुई या सहाव्या व्यक्तीवर आणि महेशच्या बहिणींवर फिरत आहे….
पोस्टमॉर्टम आणि विसेरा अहवालाकडे लक्ष ( Suspected Poisoning Case )
मृत महेशच्या नातेवाईकांनी आणि त्याच्या वहिनीने महेशच्या आईवर, त्याच्या नणंदवर हत्येचा आरोप केला आहे. नातेवाईकांचा असा दावा आहे की, मालमत्ता आपल्या नावावर व्हावी आणि महेशचा काटा निघावा, म्हणून हा सुनियोजित घातपात रचला गेला. जत्रेतून आल्यानंतर महेशच्या आईनेच ते नूडल्स बनवून दिले होते किंवा नूडल्समध्ये आधीच विष मिसळले होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. जर घरात पाच लोकांचा विष खाऊन तडफडून मृत्यू होत असेल, तर दुसऱ्या खोलीत असलेल्या आईला त्याचा सुगावा कसा लागला नाही? तिने रात्री ते नूडल्स का खाल्ले नाहीत? मालमत्तेचा वाद इतका टोकाला गेला होता की त्यातून हा घातपात घडवून आणला गेला का? हे ते प्रश्न आहेत ज्यांनी या केसचे गूढ प्रचंड वाढवले आहे.
या प्रकरणाचा खरा खुलासा हा पोस्टमॉर्टम आणि विसेरा अहवाल आल्यानंतरच होईल. सध्या पोलिसांनी मृत महेशच्या जिवंत राहिलेल्या आईची आणि तक्रारदार नातेवाईकांची कसून चौकशी सुरू केली आहे. महेशच्या बहिणी आणि जावयाचीही चौकशी केली जात असून त्यांचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले जात आहेत. हे प्रकरण आत्महत्येचे असो वा हत्येचे, एका कौटुंबिक वादाने आणि मालमत्तेच्या हव्यासाने तीन निष्पाप चिमुरड्यांसह पाच जणांचा बळी घेतला आहे, हे मात्र सत्य आहे.









