Rohit Pawar vs Ram Mohan Naidu : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत दररोज नवनवीन दावे समोर येत आहेत. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या अपघाताला कट रचल्याचं म्हटलं. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी आमदार रोहित पवार यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं म्हणत फेटाळून लावत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले राम मोहन नायडू :
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमध्ये अपघातग्रस्त विमान चालवणाऱ्या कंपनी व्हीएसआरशी तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) किंवा मंत्र्यांचा कोणताही संबंध नाही. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीसाठी मंत्रालय पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी :
खरं तर, रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राम मोहन नायडू यांच्यावर गंभीर आरोप केले. 28 जानेवारी रोजी बारामती इथं झालेल्या लिअरजेट विमान अपघातात सहभागी असलेल्या कंपनी व्हीएसआरला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्री आणि काही वरिष्ठ टीडीपी नेत्यांचे कंपनी मालकांशी जवळचे संबंध आहेत असा दावाही त्यांनी केला. रोहित पवार यांनी या प्रकरणात मंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.
रोहित पवार यांचे आरोप निराधार :
पुणे जिल्ह्यातील बारामती इथं 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. रोहित पवार यांनीही या अपघातामागे राजकीय कारणे असू शकतात असे संकेत दिले, जरी या दाव्याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. मंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी आणि विमान वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट केले आहे की हे आरोप निराधार आहेत आणि तपास नियमांनुसार सुरु आहे. त्यांचं म्हणणं आहे की अपघाताची चौकशी सर्व निर्धारित प्रोटोकॉलनुसार केली जात आहे आणि कोणतीही हलगर्जीपणा सहन केली जाणार नाही.












