America-Iran War| सध्या अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असून जोरदार युद्ध (War) सुरू आहे. अमेरिका, इस्त्रायल हे दोन देश इराणवर सातत्याने हल्ले करताना दिसत आहे. तर प्रत्युत्तर म्हणून इराण देश देखील अमेरिकेवर आणि इराणवर प्रतिहार करताना दिसत आहे. मिसाईल, ड्रोनच्या सहाय्याने या देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. तर या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. कारण अमेरिका, इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात सर्वात आधी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले होते. तसेच या हल्ल्यात इराणच्या अनेक महत्त्वाच्या इमारती, तेल प्रकल्प अशा अनेक ठिकांणांवर हल्ला करण्यात आला असून इराणला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा – इराणचा तेलसाठा उद्ध्वस्त, आकाशात काळ्या धुराचे ढग! जगाचं टेन्शन वाढलं
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणकडून नवीन सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्याकडे इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
युद्धादरम्यान इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई जखमी
इराण देश सध्या खूप वाईट काळातून जात आहे. अशातच इराणकडून आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा करण्यात आली आहे. मोजतबा खामेनेई यांनी इराणचे सर्वोच्च नेतेपद स्वीकारल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण इराण हादरला आहे.
सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई हे गंभीर जखमी झाले आहेत, असा खळबळजनक दावा इराणच्या इंटरनॅशनल वृत्तसंस्थेने केला आहे. मोजतबा खामेनेई यांनी सर्वोच्च नेतेपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याने इराणमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराणकडून इस्त्रायलवर जोरदार हल्ले
मोजतबा खामेनेई यांच्यावर हल्ला कधी, कसा आणि कुठे झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. तसेच जेव्हा मोजतबा खामेनेई यांची सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर इराणने इस्त्रायलवर जोरदार हल्ले केले होते. या हल्ल्यानंतर पुन्हा इराणवर अमेरिका, इस्त्रायलकडून प्रतिहार करण्यात आला असून मोजतबा खामेनेई जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील तेल साठ्यांना टार्गेट केलंय. इराणची राजधानी तेहरानमध्ये तेल साठ्यांवर अमेरिकेकडून भीषण हवाई हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात अनेक तेलसाठे उध्वस्त झाल्याने परिसरात प्रचंड आग आणि धुराचे लोट पसरलेत. इराणच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर झालेला हा पहिलाच मोठा प्रहार मानला जातोय. दक्षिण तेहरानमध्ये झालेल्या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.












