• Home
  • बिजनेस
  • शेअर बाजारात ऐतिहासिक निचांकी घसरण, ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले
Top News

शेअर बाजारात ऐतिहासिक निचांकी घसरण, ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले

Indian stock market

Indian stock market : जागतिक राजकारणातील वाढता तणाव आणि अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात प्रत्यक्ष युद्धाची ठिणगी पडल्याने आज भारतीय शेअर बाजारात हाहाकार माजलाय. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. या ऐतिहासिक घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण असून, काही तासांतच बाजार भांडवलातून लाखो कोटी रुपये गायब झाले आहेत.

निफ्टी ७०० अंकांच्या खाली घसरला

आज सकाळी बाजार उघडताच विक्रीचा प्रचंड दबाव दिसून आला. सेन्सेक्सने व्यवहाराच्या सुरुवातीलाच मोठी गटांगळी खाल्ली आणि तो २,४०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली असून तो ७०० अंकांच्या खाली घसरला. एकाच दिवसात बाजार इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळल्याने याला ‘ब्लॅक मंडे’ म्हटले जात आहे. गेल्या चार दिवसांतील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एकूण १६.३२ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

अमेरिकेने थेट उडी घेतल्याने परिस्थिती गंभीर

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेने थेट उडी घेतल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर आणि इस्रायलच्या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक व्यापाराला धोका निर्माण झाला आहे. युद्धाचा हा भडका जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. युद्धाच्या क्षेत्रातून होणारी तेल वाहतूक विस्कळीत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. भारत हा खनिज तेलाचा मोठा आयातदार देश असल्याने, तेलाच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम भारताच्या वित्तीय तुटीवर आणि महागाईवर होणार आहे. यामुळे पेंट, टायर आणि विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडले.

रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक निचांकी पातळीवर

जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय रुपयाची स्थिती खराब झाली आहे. आज रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक निचांकी पातळीवर पोहोचला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपला पैसा काढून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आणि डॉलरकडे वळवला आहे. केवळ भारतच नव्हे, तर जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँगसेंग आणि अमेरिकेतील नॅस्डॅक यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय दलाल स्ट्रीटवर झाला.

बँकांच्या शेअर्समध्ये ३ ते ५ टक्क्यांची घसरण

बाजारातील या भूकंपामुळे सर्वच क्षेत्रांतील शेअर्स रेड दिसले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय सारख्या मोठ्या बँकांच्या शेअर्समध्ये ३ ते ५ टक्क्यांची घसरण झाली. जागतिक मंदीच्या भीतीने इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्सही गडगडले. विमान वाहतूक तेलाच्या किमती वाढल्याने इंडिगो सारख्या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली.

सकारात्मक बातम्या येत नाहीत, तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम

बाजार तज्ज्ञांच्या मते सध्याची परिस्थिती अत्यंत अनिश्चित आहे. जोपर्यंत युद्धाबाबत सकारात्मक बातम्या येत नाहीत, तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहील. अशा वेळी किरकोळ गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊन विक्री करु नये, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही घसरण चांगल्या कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करण्याची संधी असू शकते, मात्र सध्या वेट अॅन्ड वाॅच हे धोरण स्वीकारणे हिताचे ठरेल. सद्या तरी या युद्धाच्या झळा अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत…तसेच शेअर बाजारापासून घरगुती बजेपर्यंत पोहोचल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts