Gas Shortage | मध्य पूर्वेतील युद्धामुळे (Iran US Israel War) अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये भारतालाही या युद्धामुळे अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. भारतात गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) गॅस तुटवड्यामुळे (Gas Shortage) अनेक शहरांवर मोठे संकट आले आहे. पुण्यात गॅसच्या तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स बंद करण्यात आले आहेत. तर आता पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील हिंजवडी आयटी पार्कमध्येही (IT Park) गॅस संकट आले आहे.
हेही वाचा – युद्धाची धग, होरपळलं जग! भारतात गॅस सिलेंडर मिळेना
कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना स्वत:चा डबा आणण्याच्या दिल्या सूचना
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नामांकित आयटी कंपन्यांमध्ये जेवण तयार करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना स्वत:चा डबा आणण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
गॅस तुटवड्यामुळे कॅम्पसमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी जेवण तयार करणे कंपन्यांना अशक्य झाले आहे. तर कंपन्यांच्या कॅफेटेरियामध्ये काही मोजकेच पदार्थ उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच कंपन्यांच्या महत्त्वाच्या मीटिंग, कंपन्यांचे काही कार्यक्रम यासाठी दिल्या जाणाऱ्या केटरिंग सेवा देखील काही काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सोबतच या परिस्थितीवर तोडगा म्हणून काही कंपन्या बाहेरून जेवण मागवण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते देखील अपुरे पडत असल्याची माहिती समोर आली आहे.
कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होमची मागणी
गॅस संकट निर्माण झाल्यानंतर आयटी कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमची मागणी केली आहे. जोपर्यंत खाण्यापिण्याची व्यवस्था होत नाही आणि गॅस पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावे, अशी मागणी आयटी कर्मचाऱ्यांची संघटना ‘फोरम फॉर आयटी एम्पलॉईज’कडून करण्यात आली आहे.
दरम्यान, कंपन्यांमध्ये जेवण तयार करणे अशक्य झाल्यामुळे याचा फटका पीजी आणि हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. सकाळी लवकर ऑफिसला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरून जेवण विकत घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अनेक हॉटेल्सनी वडापाव, भजी, डोसा यांसारख्या पदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अंधेरी, दादरसारख्या भागांमधील अनेक हॉटेल्सनी आपले मेनू कमी करण्यास सुरूवात केली आहे. आता काही दिवस लोकांना हॉटेलमध्ये मोजकेच पदार्थ खाता येणार आहेत.
दुसरीकडे गॅसच्या तुटवड्याचा फटका हॉटेल्स, रेस्टॉरंटसह मंत्रालयाही बसला आहे. गॅसच्या कमतरतेमुळे मंत्रालयाचे एक कॅन्टीन बंद होणार आहे. सिलेंडर मिळत नसल्यामुळे मंत्रालयात दोन-तीन दिवस कॅन्टीन बंद ठेवण्यात येणार आहे. तर ज्या कॅन्टीनला महानगर गॅसची पाईप लाईन आहे ते कॅन्टीन फक्त सुरू राहणार असल्याची माहिची दयानंद शेट्टी यांनी दिली आहे.












