Iran Intelligence Minister Ismail Khatib Killed | काही दिवसांपूर्वीच अमेरिका (US) आणि इस्त्रायने (Israel) मिळून इराणवर (Iran) जोरदार हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे. तर अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्चपदी मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांची नियुक्ती करण्यात आली. इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनेईंची नेमणूक करण्यात आल्यानंतर अमेरिका-इस्त्रायलने पुन्हा इराणवर हल्ला केला होता, ज्यात मोजतबा खामनेई गंभीर जखमी झाले होते. अशातच आता इराणला आणखी एक मोठा झटका बसला आहे. कारण इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब (Ismail Khatib) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – नवरात्री ते गुढीपाडवा…नववर्ष सणांनिमित्त पीएम मोदींचा खास संदेश; देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
अजीज नासिरसजादेह, अली लारीजानी यांच्यासह आता इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब यांचा मृत्यू झाल्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले असून मोठा धक्का बसला आहे. इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब यांच्या मृत्यूची माहिती इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी दिली आहे. तर इराणचे संरक्षण मंत्री नासिरजादेह आणि संरक्षण अधिकारी अली लारीजानी यांच्या मृत्यूची माहिती आधीच दिली गेली होती.
इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, माझे प्रिय सहकारी अजीज नासिरजादेह, अली लारीजानी आणि आता इस्माइल खातिब यांची भेकडपणे केलेली हत्या आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची हत्या आणि इतर लोकांच्या मृत्यूमुळे आम्ही शोकसागरात बुडालो आहोत, असं पेझेश्कियान यांनी म्हटलं आहे.
इस्माइल खातिब यांना इस्त्रायलने का मारलं?
इस्माइल खातिब यांना ठार केल्याबाबतची माहिती इस्त्रायलच्या डिफेन्स फोर्सेसने काल (18 मार्च) दिली होती. तेहरानमधील ठरलेल्या लक्ष्यावर हा हल्ला करण्यात आला होता, असं इस्त्रायलच्या डिफेन्स फोर्सेसने म्हटलं आहे. तसेच इस्माइल खातिब यांनी अलिकडेच झालेल्या आंदोलनावर केलेल्या कारवाईमध्ये आंदोलकांना अटक करत त्यांची हत्या करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. तसेच खातिब हे गुप्तचर मंत्रालयाची दमनकारी आणि दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते, असं इस्त्रायलच्या आयडीएफने म्हटले आहे.
इस्माइल खातिब यांना ठार करणे हे इराणी सरकारमधील अनेक वरिष्ठ कमांडर्संना संपवण्याच्या योजनेतला एक मोठा भाग होता. त्यामुळे इराण सरकारच्या नेतृत्व आणि नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले असल्याचंही इस्त्रायलच्या आयडीएफने म्हटले आहे.
इस्त्रायलने केलेल्या या हल्ल्यात इस्माइल खातिब यांचा मृत्यू झाला असून इराणला मोठा झटका मिळाला आहे. तसेच आता इस्माइल खातिब यांच्या मृत्यूनंतर इराण नेमकी काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.












