Sangli Kolhapur Accident: सांगली-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात कोल्हापूरच्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात शिरढोण गावाच्या हद्दीत रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील वकील वंदना संतोष गायकवाड (वय ३८) आणि त्यांचे पती संतोष धोंडीराम गायकवाड (वय ४५, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
हेही वाचा:
माहितीनुसार
मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य त्यांच्या MH-09-FJ-2815 क्रमांकाच्या व्हॅगनार कारने कोल्हापूरहून पंढरपूरकडे जात होते. शिरढोण गावाजवळील नायरा पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर (MH-09-CJ-2671) व त्याच्या दोन ट्रॉलींना त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रॅक्टर चालक व कामगार चहा पिण्यासाठी जवळील हॉटेलमध्ये थांबले होते. धडक अत्यंत भीषण असल्याने कार ट्रॉलीखाली अडकली आणि कारमधील दोघांचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
कोल्हापूर
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने यांचे स्विय सहाय्यक अमोल कोरे यांच्या तत्परतेमुळे मृतांची ओळख पटविणे शक्य झाले असून, अमोल कोरे यांनी तत्काळ संपर्क साधल्याने पोलिसांना मोठी मदत मिळाली.









