Mira-Bhayandar Gas Agency Inspection : मिरा-भाईंदर मध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याबाबत सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या बातम्या व मेसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातील विविध गॅस एजन्सी व गोडाऊनवर पोलीस व रेशनिंग विभागाने संयुक्त अचानक पाहणी केली.
या पाहणीदरम्यान नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी आणि रेशनिंग इन्स्पेक्टर ऋतुजा बांगरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांनी गॅस बुकिंग प्रक्रिया, सिलेंडर पुरवठा, संभाव्य तुटवडा तसेच जादा दर आकारणीबाबत एजन्सी व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा केली.
वितरण प्रक्रियेत विलंब
सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्यांमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गॅस बुकिंग वाढल्याची बाब या वेळी समोर आली. त्यामुळे काही ठिकाणी वितरण प्रक्रियेत विलंब जाणवत असल्याचेही सांगण्यात आले.
एचपी गॅस गोडाऊनमध्ये साठा
दरम्यान, भाईंदर पूर्व येथील एचपी गॅस गोडाऊनमध्ये साठा व नोंदींची तपासणी करण्यात आली. या संपूर्ण पाहणीत कोणतीही गंभीर त्रुटी आढळली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी सुरू
गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या फक्त मागील तीन ते चार दिवसांपूर्वी बुक केलेल्या गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी सुरू असून नियमित पुरवठा सुरू आहे. तसेच, सध्या तरी मिरा-भाईंदर शहरात गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा. तसेच कोणताही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधावा.










