Job Cuts at Nokia : आधीच बेरोजगारीने त्रस्त झालेल्या लोकांसाठी दुःख देणारी बातमी समोर आली आहे. जगभरातील अनेक आयटी कंपन्यांनी (IT Companies) अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला असतानाच नोकिया (nokia) कंपनी देखील १४ हजार कामगारांना (14,000 workers) कामावरून काढणार आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचारी कपातीचा भारतीय कर्मचाऱ्यांवर काय आफत ओढवणार आहे, याची माहिती जाणून घेऊ या.
हे ही वाचा: मुंबई इंडियन्स आज केकेआरला भिडणार, कोणाचं पारडं जड; वाचा सविस्तर…
कर्मचाऱ्यांवर जीवन मरणाचा प्रश्न
जागतिक स्तरावर अनेक कंपन्यांनी नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर नोकरीचे गंडांतर आले आहे. नोकिया २० टक्के नोकर कपात करणार आहे. त्यामुळे किमान १४ हजार कर्मचारी आपली नोकरी गमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सध्या नोकियाकडे जगभरात ७४ हजार कर्मचारी आहेत. त्यातील १४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. परिणामी मोठी समस्या निर्माण झाली आहे. या नोकर कपातीचा फटका भारतीय कर्मचाऱ्यांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारताच्या आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रात चिंतेचे वातावरण
गेल्या काही महिन्यापासून ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटासह अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्या कर्मचाऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असताना भारतीय कर्मचाऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे. परिणामी भारताच्या आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नोकियाच्या कामगार कपातीमागे काही कारणे सांगितली जात आहेत. 2023 मध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे अपेक्षित निकाल मिळाले नाहीत. त्यामुळे कंपनी पुन्हा जुन्या हॉरिझोंटल संरचनेकडे परतत आहे. क्लाउड अँड नेटवर्क सर्विसेस आणि मोबाईल नेटवर्क्सचे विलीनीकरण केले जात आहे. 2018 मध्ये नोकियाकडे 1 लाख 3 हजार कर्मचारी होते.
नोकिया ही फिनलंडमधील एक प्रमुख बहुराष्ट्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान कंपनी
नोकिया ही फिनलंडमधील एक प्रमुख बहुराष्ट्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे, जिची स्थापना १८६५ मध्ये झाली. एकेकाळी मोबाईल फोन बाजारपेठेत अग्रगण्य असलेली नोकिया, आता प्रामुख्याने नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, ५ जी तंत्रज्ञान, आणि क्लाउड सेवांवर लक्ष केंद्रित करते. सध्या नोकियाचे मुख्यालय एस्पो, फिनलंड येथे आहे.
नोकियाविषयी महत्त्वाची माहिती
स्थापना आणि इतिहास: १८६५ मध्ये फ्रेडरिक इदेस्तम यांनी एक पेपर मिल म्हणून याची स्थापना केली. सुरुवातीला रबर आणि केबल उद्योगात काम केल्यानंतर, २० व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनी दूरसंचार क्षेत्रात आली.
मोबाईल व्यवसाय: १९९० आणि २००० च्या दशकात नोकिया जगातील सर्वात मोठी मोबाईल फोन उत्पादक कंपनी होती. २०१४ मध्ये, नोकियाने आपला मोबाईल फोन व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विकला.
सध्याचे कार्य: सध्या नोकिया प्रामुख्याने ५जी नेटवर्क उपकरणे, फिक्स्ड नेटवर्क, आयपी राउटिंग आणि ऑप्टिकल नेटवर्क्स तयार करते.
एचएमडी ग्लोबल: नोकियाच्या ब्रँड नावाखाली स्मार्टफोन आणि फीचर फोन बनवण्याचे हक्क आता ‘एचएमडी ग्लोबल’ या कंपनीकडे आहेत.
भारतातील उपस्थिती: चेन्नई (भारत) येथे नोकियाचा मोठा कारखाना आहे, जिथे ५जी/४जी रेडिओ उपकरणांचे उत्पादन केले जाते.







