Laxman Hake | सध्या राज्याच्या राजकारणात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून (Baramati By Election) मोठ्या हालचाली सुरू आहेत. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या रणांगणात उतरणार आहेत. तर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सर्व पक्षांना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता लक्ष्मण हाकेंनी या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलने व्यक्त केला संताप, म्हणाली, त्या माणसावर…
लक्ष्मण हाके बारामती विधानसभा निवडणूक लढवणार की नाही?
बारामती विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? याबाबत लक्ष्मण हाकेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही त्यामुळे माझी कुठलीही राजकीय चाल नाहीये. मी एक ओबीसी आंदोलक असून मी भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी आवाज उठवत असतो.
सध्या बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे मला काही प्रश्नांकडे लक्ष वेधून घ्यायचं होतं. बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मी काही गोष्टी आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. मागच्या वर्षापासून माझे काही प्रश्न आहेत जे अजूनही मार्गी लागलेले नाहीयेत. ओबीसींच्या अनेक मागण्या आहेत, यासाठी माझी लढाई आहे. मी अजित दादांना डोळ्यासमोर ठेऊन आक्रमकपणे भूमिका मांडत असतो, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, सुनेत्रा ताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला विनंती केली आहे. तसेच धनंजय मुंडे, उदय सामंत या सर्वांनी मला फोन केला होता, त्यानंतर मी या निवडणुकीबाबत विचार केला आहे, अशी माहिती हाकेंनी दिली.
मला सुनेत्रा ताईंनी फोन केला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी देखील फोन केला होता. त्यामुळे एवढी सगळी मंडळी मला फोन करत असताना आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे या निवडणुकीतून मी माघार घेतली आहे, अशी भूमिका लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता हाके बारामती पोटनिवडणूक लढवणार नाहीयेत.
दरम्यान, काल (5 एप्रिल) लक्ष्मण हाके यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही प्रचंड नाराज आहोत, आमचे आरक्षण गेले आहे. आमच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाहीये, त्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत, अशी मोठी घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली होती. तर आता त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.












