Crackdown on Gold Smuggling : महसूल गुप्तचर संचालनालयानं (DRI) नुकतेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. संघटित सोन्याच्या तस्करीविरोधातील या मोठ्या कारवाईत, डीआरआयनं 37.74 कोटी रुपये किमतीचं 29.37 किलो सोनं जप्त केलं असून आतापर्यंत 26 तस्करांना अटक केली आहे. याप्रकरणात 25.10 किलो सोन्याच्या विटा आणि 4.27 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा : आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 919 अंकांनी वधारुन बंद, निफ्टीतही मोठी वाढ
कसा रचला सापळा :
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी 8 एप्रिल 2026 रोजी नैरोबीहून आलेल्या महिला वाहकांच्या एका गटाला ओळखलं, जे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळामार्फत मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणार होत्या. 8 एप्रिल रोजी, सकाळी सुमारे 11 वाजता, प्रवासी ग्रीन चॅनलच्या दिशेनं पुढं गेल्या, परंतु अधिकाऱ्यांना पाहताच त्या मागे फिरल्या. चौकशीदरम्यान, 25 प्रवाशांनी स्वतःची ओळख सांगितली, तर बनावट पासपोर्ट वापरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 26व्या प्रवाशाला आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं. सर्व 25 प्रवाशांनी कोणतीही बेकायदेशीर वस्तू बाळगल्याचं नाकारलं. मात्र, दोन प्रवाशांची झडती घेतली असता त्यांच्या बुटांमध्ये सोन्याच्या विटा लपवलेल्या आढळल्या.
न्यायालयानं आरोपींना सुनावली न्यायालयीन कोठडी :
एका अधिकाऱ्यानं सांगितलं, “काही प्रवाशांनी लगेज बेल्टजवळ काळ्या टेपनं गुंडाळलेल्या वस्तू फेकायला सुरुवात केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं (DRI) वितळलेलं सोनं असलेल्या अनेक पिशव्या जप्त केल्या. कोणत्याही प्रवाशानं याची जबाबदारी स्वीकारली नाही.” अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथं न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) जलद आणि समन्वित कारवाईमुळं, या प्रवाशांकडून 25.10 किलो सोन्याच्या विटा आणि 4.27 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.




