Chhattisgarh Major Accident : छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील वेदांता पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी एक मोठा अपघात झाला. बॉयलरच्या स्फोटात (boiler explosion) 10 कामगार ठार झाले आणि 15 जण गंभीररित्या भाजले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना सिंहितराई येथील वेदांता पॉवर प्लांटच्या (vedanta power plant) डाभ्रा परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात एकट खळबळ उडाली.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्गाचे उद्घाटन; आता अडीच तासात
अनेक कामगार अडकल्याची भीती :
याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी सिंहितराई गावातील वेदांता लिमिटेडच्या पॉवर प्लांटमध्ये बॉयलर ट्यूबचा स्फोट झाला. सक्ती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर म्हणाले, “10 कामगारांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.” माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस पथकं घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरु केलं. अधिकाऱ्यानं सांगितलं की, जखमींना उपचारासाठी रायगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर बचावकार्य सुरु असून, काही कामगार अजूनही प्लांटमध्ये अडकले असण्याची भीती आहे.
घटनेनंतर प्लांटमध्ये घबराट :
वीज प्रकल्पातील स्फोटामुळं कामगारांमध्ये घबराट पसरली. सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आलं. प्लांटचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी हजर झाले. जखमी कामगारांवर सध्या उपचार सुरु आहेत. बॉयलर स्फोटाचं कारण अद्याप उघड झालेलं नाही. तपासानंतर स्फोटाचे कारण निश्चित केलं जाईल.
मुख्यमंत्री सायकडून दुःख व्यक्त :
या घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “सक्ती जिल्ह्यातील सिंहथिराई येथील वेदांता वीज प्रकल्पात झालेल्या भीषण बॉयलर स्फोटाची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. या अपघातात काही कामगारांचा मृत्यू आणि जखमी झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, दिवंगत आत्म्यांना त्याच्या चरणी स्थान मिळो आणि हे असह्य दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. जिल्हा प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून, मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्यासाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या अपघातात जखमी झालेले सर्वजण लवकर बरे व्हावेत, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी सुनिश्चित केली जाईल. या प्रकरणात दोषी आढळलेल्या कोणावरही कठोर कारवाई केली जाईल.”





