PBKS Beat LSG : आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सची विजयी मालिका कायम आहे. आयपीएल 2026 च्या 29व्या सामन्यात पंजाबनं लखनऊ सुपर जायंट्सला 54 धावांनी पराभूत करून या हंगामातील आपला पाचवा विजय नोंदवणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला. पंजाब आधीच गुणतालिकेत अव्वल स्थानी होता आणि या पाचव्या विजयामुळं संघानं अव्वल स्थानावरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
हेही वाचा : अखेर केकेआरचं विजयाचं खातं उघडलं; राजस्थानचा पराभव करत मिळवला पहिला
पंजाबनं उभारला धावांचा डोंगर :
मुलानपूर इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात, लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सनं 7 गडी गमावून 254 धावा केल्या. कूपर कॉनोली आणि प्रियांश आर्या यांनी पंजाबसाठी स्फोटक खेळी केली. कूपरनं 87 धावा, तर प्रियांशनं 93 धावा केल्या. लखनऊसाठी प्रिन्स यादव आणि एम. सिद्धार्थ यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
पंजाबचा मोठा विजय :
पंजाब किंग्सच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना लखनऊच्या डावाची सुरुवात शानदार झाली. आयुष बडोनी आणि मिचेल मार्श यांनी पॉवरप्लेमध्ये मिळून 61 धावा केल्या. मात्र, सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आयुष बडोनी बाद झाला. त्यानंतर 40 धावा करुन मिचेल मार्शही बाद झाला. 11.1 षटकांत धावसंख्या 109 पर्यंत पोहोचली, तोपर्यंत लखनऊनं दोन फलंदाज गमावले होते. धावगती वाढवण्याची नितांत गरज होती, पण 139 धावांत चार गडी गमावून एलएसजीचा डाव अडखळला. अखेरीस, एडन मार्करम आणि मुकुल चौधरी यांनी धावगती वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण पंतचा संघ 20 षटकांच्या अखेरीस पाच गडी गमावून केवळ 200 धावाच करू शकला. अशाप्रकारे, पंजाबनं 54 धावांनी मोठा विजय मिळवला.








