MLA Threat to Historian : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच आपल्या वाचाळ बोलण्यानं वादात असतात. गायकवाड यांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना संजय गायकवाड यांनी फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली असून, त्यांच्या कुटुंबीयांविषयी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, गायकवाड यांनी या क्लिपमधील आवाज आपलाच असल्याची कबुली देत आपल्या कृत्याचे समर्थन केले आहे.
घरातील महिलांविषयीही अत्यंत खालच्या स्तरावर वक्तव्ये
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक वैचारिक वर्तुळात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी संवाद साधताना आमदार संजय गायकवाड यांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. महाराजांचा इतिहास आणि त्यासंदर्भातील विचार मांडताना गायकवाड यांनी लोकप्रतिनिधी पदाची प्रतिष्ठा विसरून आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. या संभाषणादरम्यान गायकवाड यांनी केवळ आंबी यांनाच नव्हे, तर त्यांच्या घरातील महिलांविषयीही अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्ये केली आहेत.
“तुला चिरडून टाकेल आणि तुझी जीभ छाटेल;” गायकवाड
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार गायकवाड यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. त्यांनी प्रशांत आंबी यांना थेट इशारा दिला आहे की, “तुझ्या घरात घुसून तुला मारेन.” इतक्यावरच न थांबता, “तुला चिरडून टाकेल आणि तुझी जीभ छाटेल,” अशी टोकाची धमकीही त्यांनी दिली आहे. लोकशाहीत एखाद्या पुस्तकाचा विषय किंवा लेखकाचे विचार न पटल्यास त्यावर तात्विक चर्चा होणे अपेक्षित असताना, थेट जीभ कापण्याची भाषा एका आमदाराने केल्यामुळे कायद्याच्या राज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
“होय, मीच शिवीगाळ अन् धमकी दिली”; गायकवाडांची कबुली
सहसा अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप बाहेर आल्यावर संबंधित नेते ‘ती क्लिप बनावट आहे’ किंवा ‘माझा आवाज नाही’ असा पवित्रा घेतात. मात्र, संजय गायकवाड यांनी थेट माध्यमांसमोर येत ही क्लिप आपलीच असल्याची कबुली दिली. “होय, मीच शिवीगाळ केली अन् धमकी दिली, मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे,” असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, असे भावनिक कार्ड खेळत त्यांनी आपल्या गुंडशाही प्रवृत्तीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराजांचे नाव घेऊन एका सामान्य नागरिकाच्या कुटुंबाचा उद्धार करणे हे शिवरायांच्या विचारात बसत नाही, हे यांना कोण सांगणार…
पुरोगामी महाराष्ट्रात धमकावणे हे लोकशाहीला घातक
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी गायकवाड यांच्या अटकेची मागणी केली असून सत्ताधारी पक्षातही या भाषेमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रशांत आंबी यांनी याप्रकरणी पोलीस संरक्षणाची आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात, जिथे विचारांची लढाई विचारांनी लढली जाते, तिथे अशा प्रकारे धमकावणे हे लोकशाहीला घातक असल्याचे मत विचारवंतांनी व्यक्त केले आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच उचलल्याचा आरोप
“बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासातील कँटीन मधे हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो. राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघीतली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे.
खुलेआम गुंडगिरी करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी
पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देताना ‘पानसरेचे जे हाल केले, ते करण्याची’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का, याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी….अशी मागणी सपकाळ यांनी आपल्या पोस्टमधून केलीय..











