Black Panther India: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून एक अत्यंत दुर्मिळ आणि उत्साहवर्धक नोंद समोर आली आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘ब्लॅक पँथर’ म्हणजेच काळा बिबट्या दिसल्याचे छायाचित्र कैद झाले असून, या घटनेमुळे परिसरातील जैवविविधतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
सह्याद्री व्याघ प्रकल्पात वाघांची संख्या वाढत असतानाच हे दुर्मिळ दृश्य नोंदवले गेले आहे. काळा बिबट्या हा प्रत्यक्षात मेलॅनिस्टिक (गडद रंगछटा असलेला) बिबट्या असून तो फारच क्वचित दिसतो. विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील घनदाट जंगलामध्ये अशा बिबट्यांचे अस्तित्व अधूनमधून आढळते.
हेही वाचा: मोठी बातमी! 10वी-12वीसाठी 17 नंबर फॉर्म भरण्याची शेवटची संधी; ‘या’ तारखेपर्यंत मुदत
तिलारी, राधानगरी आणि रत्नागिरी परिसरात या प्रकारच्या बिबट्यांची निरीक्षणे अधिक प्रमाणात नोंदवली गेली आहेत. हे सर्व भाग जास्त पर्जन्यमान असलेले असल्याने येथे घनदाट वनराई आणि अनुकूल अधिवास उपलब्ध आहे. त्यामुळे अशा प्राण्यांना नैसर्गिकरित्या लपण्यासाठी आणि जगण्यासाठी योग्य वातावरण मिळते.
प्राणी तज्ज्ञांच्या मते, काळ्या बिबट्यांच्या गडद रंगामुळे त्यांना जंगलात उत्कृष्ट प्रकारे छलावरण (कॅमोफ्लाज) मिळते, ज्यामुळे ते सहज दिसत नाहीत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यापूर्वीही काळ्या बिबट्याच्या नोंदी झाल्या आहेत, मात्र त्या तुलनेने कमी होत्या. यावेळी कॅमेरा ट्रॅपमध्ये स्पष्ट छायाचित्र मिळाल्याने त्यांच्या अस्तित्वाचा अधिक ठोस पुरावा मिळाल्याचे मानले जात आहे. ही नोंद प्राणीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.









