Silver Prices Crash : भारतीय सराफा आणि वायदे बाजारात (MCX) सध्या लक्षणीय हालचाल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या चांदी आणि सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या अचानक घसरणीनं गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांनाही आश्चर्यचकित केलं आहे. विशेषतः चांदीच्या किमतींमधील तीव्र घसरण चर्चेचा विषय बनली आहे. अवघ्या पाच दिवसांपूर्वी, 20 एप्रिल रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) प्रति किलोग्राम ₹2,54,000 चा टप्पा ओलांडलेल्या चांदीच्या किमतीत आता लक्षणीय घसरण नोंदवली गेली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, चांदीचा भाव प्रति किलोग्राम ₹2,44,321 पर्यंत घसरला आहे. याचा अर्थ, एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत चांदीच्या किमतीत तब्बल ₹9,679 (अंदाजे ₹10,000) ची घट झाली आहे.
हेही वाचा : राज्यसभेत आपला मोठा धक्का; राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदार भाजपमध्ये
सोन्याच्या किमतीही नरमल्या :
चांदीसोबतच सोन्याच्या किमतीही घसरल्यानं, लग्नसराईच्या काळात खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 20 एप्रिल रोजी एमसीएक्सवर सोन्याने प्रति 10 ग्रॅम ₹1,54,000 चा टप्पा ओलांडला होता. मात्र, ताज्या माहितीनुसार, सोन्याचे भाव आता प्रति 10 ग्रॅम ₹1,52,700 पर्यंत घसरले आहेत. त्यामुळं, सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम अंदाजे ₹1300 ची घसरण झाली आहे.
का घसरत आहेत किमती ? :
बाजार तज्ज्ञांच्या मते, जागतिक डॉलर मजबूत झाल्यामुळं आणि उच्च पातळीवर नफावसुली (प्रॉफिट-बुकिंग) झाल्यामुळं मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्या आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय भू-राजकीय तणावात किंचित स्थिरता आल्याच्या बातम्यांमुळं गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं आणि चांदीमधून पैसे काढण्यास भाग पडलं आहे.
खरेदीदारांसाठी काय संकेत आहेत? :
जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल, तर ही घसरण एक संधी असू शकते. मात्र, बाजार तज्ज्ञांच्या मते, जागतिक संकेतांमुळं किमतींमध्ये आणखी चढ-उतार होऊ शकतात.












