• Home
  • राजकारण
  • राजकीय भूकंप! रात्री २ वाजता ठाकरे-फडणवीस भेट, ‘प्रबुद्ध भारत’चा दावा
Top News

राजकीय भूकंप! रात्री २ वाजता ठाकरे-फडणवीस भेट, ‘प्रबुद्ध भारत’चा दावा

Thackeray Fadnavis midnight meeting

Thackeray Fadnavis midnight meeting : महाराष्ट्राच्या राजकारणाचं सगळं अटेन्शन पवार फॅमिलीनं खेचून घेतलं असताना आता पडद्यामगे मोठा गेम सुरू आहे का? असा सवाल उपस्थित झालाय. कारण काल रात्री दोन वाजता उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झालीय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपामधील सौख्य पाहता, या भेटीच्या चर्चांना अधिकच उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी आपले कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर संजय राऊत यांनीही राजकीय संस्कृतीचा हवाला देत या भेटीवर सारवासारव केली होती. मात्र, अशा भेटीगाठींमुळेच भाजपा आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, यातच आता या मीडिया हाऊसनं केलेल्या ठाकरे आणि फडणवीसांच्या मध्यरात्रीच्या भेटीचं सत्य काय? खरंच अशी भेट झाली का? आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे हे संकेत आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य नागरीकांना पडली आहेत.

‘प्रबुद्ध भारत’ या वृत्तपत्राचा धक्कादायक दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच एका खळबळजनक बातमीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ‘प्रबुद्ध भारत’ या वृत्तपत्राने नुकताच एक अत्यंत धक्कादायक दावा केला असून, त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मध्यरात्री दोन वाजता एक गुप्त भेट झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वृत्तामुळे केवळ सत्ताधारी महायुतीमध्येच नव्हे, तर महाविकास आघाडीच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मध्यरात्री गुप्तपणे भेटले

‘प्रबुद्ध भारत’ने आपल्या वृत्तात असे म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. सार्वजनिकरीत्या एकमेकांवर टोकाची टीका करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे मध्यरात्रीच्या सुमारास गुप्तपणे भेटले. ही भेट मुंबईतील एका अतिशय सुरक्षित अशा शासकीय बंगल्यावर पार पडल्याचे सांगण्यात येते. या भेटीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही नेत्यांचे सुरक्षारक्षक आणि ताफा यापासून दूर ठेवून ही चर्चा झाल्याचे या दाव्यात नमूद करण्यात आले आहे.

 “मी नक्कीच फोन उचलेन आणि आमची चर्चाही होईल,” – फडणवीस

काही दिवसांपूर्वी एका खाजगी कार्यक्रमातील मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले होते की, “जर रात्री २ वाजता उद्धव ठाकरेंचा फोन आला, तर तुम्ही उचलणार का?” त्यावर फडणवीस यांनी अतिशय मिश्किलपणे “मी नक्कीच फोन उचलेन आणि आमची चर्चाही होईल,” असे उत्तर दिले होते. फडणवीस यांच्या या विधानाची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. आता ‘प्रबुद्ध भारत’ने थेट भेटीचाच दावा केल्यामुळे, फडणवीस यांचे ते विधान केवळ विनोद नव्हता तर त्यामागे काहीतरी शिजत होते का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत.

शिवसेना आणि भाजपमधील ३० वर्षांची युती तुटली

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमधील ३० वर्षांची युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले आणि भाजपने शिंदेंना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. तेव्हापासून ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संबंध अत्यंत ताणलेले आहेत. फडणवीस यांनी ठाकरेंवर ‘विश्राम’ केल्याची टीका केली होती, तर ठाकरेंनी फडणवीस यांचा उल्लेख ‘कलंक’ असा केला होता.

त्यामुळे मध्यरात्रीच्या गुप्त भेटीच्या वृत्ताकडे दुर्लक्ष करता येणार नाही

अशा कट्टर राजकीय शत्रूंमध्ये जर खरोखरच गुप्त भेट झाली असेल, तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मोठे संकेत मानले जात आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा जवळ येणार का? की ही भेट केवळ एक वैयक्तिक चर्चा होती? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या खळबळजनक दाव्यानंतर अद्याप शिवसेना यूबीटी किंवा भाजपच्या अधिकृत प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांनी ही बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. तरीही राजकीय विश्लेषकांच्या मते, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही अशक्य नाही. यापूर्वी पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतरचे सत्तापालट पाहता, मध्यरात्रीच्या गुप्त भेटीच्या वृत्ताकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

 ‘प्रबुद्ध भारत’च्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात ‘वेक-अप कॉल’

सोशल मीडियावर ‘प्रबुद्ध भारत’चे हे कात्रण प्रचंड व्हायरल होत आहे. निष्ठावान शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते या बातमीमुळे बुचकळ्यात पडले आहेत. जर हे नेते गुप्तपणे भेटत असतील, तर खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांनी एकमेकांशी का लढावे, असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या या बातमीची सत्यता पडताळली जात असली तरी, ‘प्रबुद्ध भारत’च्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात ‘वेक-अप कॉल’ दिला आहे, हे मात्र नक्की. आगामी काळात यावर दोन्ही दिग्गज नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ते म्हणतात ना राजकारणात कोणच कुणाचा पर्मनंट मित्र नसतं, तसेच कोणचा कुणाचा पर्मनंट शत्रूही नसतं, सरड्यापेक्षा जास्त रंग बदलायला नेते कमी करत नाहीत, ज्या पक्षावर कडाडून टीका करतात, वेळ आल्यावर त्याच पक्षाशी आपल्या सोयीसाठी युतीही करतात, अनेक नेते ज्या पक्षावर तुटून पडतात, नंतर त्याच पक्षात प्रवेश करून त्याचा झेंडा हाती घेऊन मिरवतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मात्र एकमेकांची डोकी फोडताना आणि रस्त्यावर भिडताना हा विचार नक्की करावा, तुमचे नेते मात्र एसीत बसून त्यांना हवं तेच आणि जे सोयीचं आहे, तेच निर्णय घेतात…तुम्ही सतरंज्या उचलत राहता…त्याम्ही पोलिसांच्या केसेस अंगावर घेता…त्यामुळे कुणा नेत्यासाठी हे सगळं करण्याआधी हे किती पर्मनंट आहे…याचा विचार करा…अन्यथा…ज्यावर धावून गेलो, त्याचच प्रचार करायची वेळ तुमच्यावरही येऊ शकते, आणि हे तर महाराष्ट्राचं राजकारण आहे, यात लग्न एकासोबत, मंगळसुत्र दुसऱ्याचं तर संसार तिसऱ्यासोबत हे महाराष्ट्रानं गेल्या काही दिवसांत पाहिलंच आहे…तेच पुन्हा एकदा बघायला मिळालं तर आश्चर्य नको.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts