Mumbai auto taxi Marathi rule postponed : १ मे पासून मुंबईतील सर्व ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक असेल, असं महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र, आता तीव्र विरोध झाल्यानंतर हा निर्णय सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या काळात मराठी भाषिक आणि अमराठी ऑटो-रिक्षा चालकांची पडताळणी सुरू राहील. मुंबईतील रिक्षा चालकांसाठी मराठी शिकणे अनिवार्य केले जाईल, जर रिक्षा चालक मराठी बोलले नाहीत, तर त्यांचे परवाने रद्द केले जातील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. यामुळे मराठी विरुद्ध अमराठी हा वाद पुन्हा पेटला आहे.
अनेक नेत्यांनी या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे त्यापैकीच एक आहेत. मराठी भाषेच्या अनिवार्यतेच्या विरोधात असलेल्यांच्या आंदोलनामुळे कोणत्याही मराठी व्यक्तीला गैरसोय झाल्यास त्यांना रस्त्यावर मारहाण केली जाईल, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठीच्या नावाखाली होणाऱ्या गुंडगिरीचा निषेध
मराठी न बोलणाऱ्यांसोबतच, विरोधी पक्षातील नेत्यांनीही मराठीच्या नावाखाली होणाऱ्या गुंडगिरीचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी बोलले पाहिजे. जे बोलत नाहीत त्यांना मराठी शिकवली पाहिजे, पण भाषेच्या नावाखाली गुंडगिरी होता कामा नये. मराठी शिकवण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे, एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील म्हटलं आहे.
मराठी न बोलणाऱ्या रिक्षांच्या चालकांच्या रिक्षांवर स्टिकर्स
ऑटो-रिक्षा चालकांना मराठी वाचता किंवा लिहिता येणे आवश्यक नाही; त्यांना फक्त बोलण्याची भाषा शिकण्याची गरज आहे, असं महाराष्ट्र सरकारने आधीच सांगितलं आहे . राज्यातील ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी सरकार एक प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करेल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या ऑटो-रिक्षांच्या चालकांच्या रिक्षांवर स्टिकर्स लावण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाची मराठी शिकवण्याची जबाबदारी
“मुंबई मराठी साहित्य संघाने राज्यभरातील आपल्या विविध शाखांमध्ये ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे मराठी भाषेला प्रोत्साहन मिळेल. कोकण प्रदेशात मराठी शिकवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदही सहकार्य करेल, असं परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले.








