मुंबई Share Market Crashed : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजची सकाळ एक दुःस्वप्न ठरली. जागतिक बाजारांमधून मिळणारे संमिश्र संकेत आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या अचानक वाढीमुळं भारतीय शेअर बाजारात भूकंप पाहायला मिळाला. आज बाजार उघडताच दलाल स्ट्रीटवर घबराट पसरली आणि गुंतवणूकदारांनी काही क्षणात लाखो करोडो रुपये गमावले.
हेही वाचा : रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ ब्लॉकबस्टर आधीच? रिलीजपूर्वीच 193 कोटींचा बिझनेस
मोठ्या घसरणीसह बाजाराची सुरुवात :
आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी, सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीसह उघडले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 910.03 अंकांनी, म्हणजेच 1.47 टक्क्यांनी घसरुन 76,586.33 वर आला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निफ्टी देखील 282.80 अंकांनी 1.17 टक्क्यांनी घसरुन 23,894.85 वर व्यवहार करत होता. एका आठवड्यानंतर, निफ्टी पुन्हा 24,000 च्या खाली घसरल्यानं व्यापाऱ्यांमध्ये घबराट वाढली आहे.
शेअर बाजारात मोठी घसरण :
आज व्यवहाराच्या सुरुवातीला, वाढणाऱ्या शेअर्सपेक्षा घसरणाऱ्या शेअर्सची संख्या खूप जास्त होती. आकडेवारीनुसार, अंदाजे 1,371 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, तर केवळ 873 शेअर्समध्ये वाढ झाली. दरम्यान, अंदाजे 137 शेअर्सची स्थिती स्थिर राहिली. बँकिंग, ऑटो आणि आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे बाजाराला सावरता आलं नाही.
कच्च्या तेलाच्या किमतींमुळं व्यवहारात अडथळा :
बाजारातील या मोठ्या घसरणीचं मुख्य कारण कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ असल्याचं मानलं जातंय. अमेरिकेनं इराणवर दबाव वाढवल्यामुळं कच्च्या तेलाच्या किमती 120 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत. भारत आपल्या तेलाच्या गरजांपैकी बहुतांश तेल आयात करतो, त्यामुळं वाढत्या तेलाच्या किमतींमुळं देशाची व्यापार तूट वाढेल आणि महागाई वाढेल अशी भीती निर्माण झाली आहे. या भीतीमुळं गुंतवणूकदारांनी सर्वच क्षेत्रांतील शेअर्सची विक्री केली आहे.











