चेन्नई CSK vs MI Match Today : इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 44वा साखळी सामना चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरु होईल. हंगामात आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं अनिवार्य आहे.
हेही वाचा : मुंबई-पुणे सुसाट रस्ता, दमदार ड्राइव्ह; पाहा देवेंद्र फडणवीसयांचा ‘मिसिंग लिंक’वर
दोन्ही संघांची आतापर्यंत निराशजनक कामगिरी :
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ट्रॉफी जिंकलेल्या या दोन आयपीएल संघांसाठी हा हंगाम फारसा रोमांचक ठरलेला नाही. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत आठ सामने खेळले असून, त्यात त्यांना तीन विजय आणि पाच पराभव पत्करावे लागले आहेत. तर दुसरीकडे, मुंबई इंडियन्सनं (MI) आपल्या आठ सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. परिणामी, या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी या दोन्ही संघांसाठी उर्वरित सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मुंबईला हिशोब चुकता करण्याची संधी :
आयपीएल 2026 हंगामातील चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा दुसरा सामना आहे. या दोन संघांमधील यापूर्वीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता, ज्यात CSK नं 103 धावांच्या फरकानं दणदणीत विजय मिळवला होता. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हेड टू हेड सामन्यांच्या नोंदीबद्दल बोलायचं झाल्यास, आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण 40 सामने खेळले गेले आहेत, ज्यात चेन्नई सुपर किंग्सनं 19 तर मुंबई इंडियन्सनं 21 सामने जिंकले आहेत. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण नऊ सामने खेळले गेले आहेत, ज्यात चेन्नई सुपर किंग्सनं चार तर मुंबई इंडियन्सने पाच सामने जिंकले आहेत.
बुमराह आणि सॅमसनवर असेल सर्वांची नजर :
या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास संजू सॅमसनच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असतील. ज्यानं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागील सामन्यात शतक झळकावत जोरदार खेळी केली होती. याशिवाय, दुसरं नाव आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं, ज्याच्यासाठी आयपीएलचा हा हंगाम एका दुःस्वप्नापेक्षा कमी ठरलेला नाही आणि अशा परिस्थितीत तो कसा पुनरागमन करतो याकडे सर्वांच्या नजरा असतील.












