• Home
  • गुन्हा
  • भोरनंतर खेडमध्येही धक्कादायक घटना; तीन वर्षांच्या चिमुकल्यावर अत्याचार करून संपवलं
Top News

भोरनंतर खेडमध्येही धक्कादायक घटना; तीन वर्षांच्या चिमुकल्यावर अत्याचार करून संपवलं

Khedh

Pune Khed Crime News: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खालुंब्रे गावात तीन वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे सध्या परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चाकणमधील म्हाळुंगे (दक्षिण) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संबंधित आरोपी हा अंदाजे १६ वर्षांचा अल्पवयीन असून तो मूळचा बिहार राज्यातील असल्याचे सांगितले जात आहे. नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून रोजगाराच्या निमित्ताने ते चाकण परिसरात वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशी, संबंधित मुलगा शेजारी राहणाऱ्या एका मुलीला बोलवण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र, बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.

कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही तत्काळ तपास सुरू करत परिसरात शोधमोहीम राबवली. शोधादरम्यान, शेजारी राहणाऱ्या संशयित तरुणाच्या खोलीत एका सुटकेसमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला.

प्राथमिक तपासात मुलाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याच्या शरीरावर गंभीर जखमांचेही चिन्ह आढळले आहेत, ज्यामुळे अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts