Election Results 2026 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या निकालाचे आकडे हाती येयला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर राज्यातील बारामती आणि राहूरी या दोन पोटनिवडणूकीकडे देखील सर्वांचे लक्ष लागलं आहे. सध्या हाती आलेल्या पोस्टल मतांच्या (Postal Ballots) आकडेवारीनुसार, सर्वात चर्चेत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सध्या २९३ जागांपैकी भाजप ११९ जागांवर आघाडीवर आहे तर, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस १०९ जागांवर आघाडीवर दिसत आहे. ममता यांची मागील अनेक वर्षांची सत्ता खालसा करण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले आहे. पंतप्रधानांसह केंद्रातील अनेक बढ्या नेत्यांची फौज येथे ठाण मांडून बसली होती. त्याचे परिणाम आता हाती आलेल्या निकालातून दिसून येत आहेत.
देशाच्या राजकारणाची आगामी दिशा ठरवणाऱ्या आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून या पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतपत्रिकांची मोजणी संपली असून ईव्हीएम (EVM) द्वारे एक-दोन फेऱ्यांचे निकाल हाती आले आहेत.
हेही वाचा – आसाम-बंगालसह पाच राज्यांच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु; कोण मारणार बाजी, देशातं लक्ष
पश्चिम बंगाल (२९३ जागा) :
पश्चिम बंगालमध्ये २९३ जागांवर मतदान पार पडले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. पहिल्या काही तासांमध्ये भाजपने १९९ तर टीएमसीने १०९ जागांवर आघाडी घेतली आहे. भवानीपूर या हाय-प्रोफाइल जागेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यात चुरस आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
तामिळनाडू (२३४ जागा) :
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या द्रमुकने (DMK) ७२ जागांवर आघाडी कायम ठेवली असली. तर सुपरस्टार थलपथी विजय यांच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने ६२ जागांवर आघाडी घेत राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर एडीएमकेसह भाजप आघाडीला ३१ जागांवर आघाडी आहे. येथे तिरंगी लढत होत आहेत.
केरळ (१४० जागा) :
केरळमध्ये सत्तांतर होणार की एलडीएफ इतिहास घडवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या युडीएफ (UDF) ८४ जागांवर तर सत्ताधारी एलडीएफ (LDF) ५१ जागांवर पुढे आहे. एनडीए ९ आणि इतर २ जागांवर आघाडी घेत आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे.
आसाम (१२६ जागा) :
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. सुरुवातीच्या पोस्टल मतमोजणी आणि पहिल्या एक-दोन फेऱ्यांच्या आलेल्या कलानुसार भाजप ६६ तर काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे.
पुद्दुचेरी (३० जागा) :
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीत एन. रंगस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एनआरसी (NRC) ३३ जागांसह पुन्हा सत्तेकडे वाटचाल करताना दिसत आहे. तर काँग्रेसने ६ जागांवर आघाडी घेतली आहे.
बारामती आणि राहूरी पोटनिवडणूक
महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होणाऱ्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यासह अन्य काही उमेदवार निडणूकीच्या रिंगणात आहेत. एकूण २७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. पहिल्या फेरीत राहुरीत अक्षय कर्डिले ९ हजार ६३७ मतांनी आघाडीवर आहेत. तर पहिल्या फेरी अखेर सुनेत्रा पवार १६ हजार ५४३ मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.












