Father murders daughter : क्रौर्याची सीमा ओलांडणारी एक धक्कादायक बातमी पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. ज्या बापाने रक्षण करायला हवं होतं, त्याच बापाने आपल्या पोटच्या पोरांचा काळ बनून गळा आवळला. पत्नी सोडून गेल्याचा राग एका नराधम पित्याने आपल्या चिमुकल्या लेकरांवर काढला. साडेतीन वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केली, तर पाच वर्षांच्या मुलालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे घडली आहे.
नातेसंबंधातील कडवटपणा जेव्हा डोक्यात शिरतो, तेव्हा माणूस किती हिंस्त्र बनू शकतो, याचं विदारक उदाहरण म्हणजे आळेफाट्यातील ही घटना. सागर शिंदे… मोशीचा राहणारा हा इसम. पत्नी सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेली, म्हणून तो संतापलेला होता. पण या संतापाचा बळी ठरली ती दोन निष्पाप फुलं!
दोन लेकरांचा गळा दाबून घेतला जीव
काळजाच्या तुकड्यांना म्हणजेच आर्यन आणि हर्षदाला “फिरायला नेतो” असं खोटं सांगितलं. त्यांना पुणे-नाशिक महामार्गावरील संतवाडीच्या निर्जन जंगलात नेलं. तिथे त्याने आधी ५ वर्षांच्या आर्यनचा गळा दाबला. मुलगा हालचाल करेनासा झाल्यावर तो मेला, असं समजून त्याला झुडपात फेकून दिलं. त्यानंतर त्याने वळवला आपला मोर्चा साडेतीन वर्षांच्या हर्षदाकडे… आणि एका नराधमासारखा तिचा गळा आवळून तिचा जीव घेतला.
बापाचं हे काळं कृत्य जगासमोर आलं
पण म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी’. आर्यन जिवंत होता. तो शुद्धीवर आला आणि आळेफाटा पोलिसांना सापडला. एका बेवारस मुलाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली आणि बापाचं हे काळं कृत्य जगासमोर आलं. पोलिसांनी आरोपी सागर शिंदेला बेड्या ठोकल्या आहेत.
पत्नीशी असलेल्या भांडणाचा बदला स्वतःच्या मुलांकडून
“आज या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा सुन्न झाला आहे. पत्नीशी असलेल्या भांडणाचा बदला स्वतःच्या मुलांकडून घेणाऱ्या या बापाला समाज कधीच माफ करणार नाही. हर्षदाचा जीव गेलाय, तर आर्यनच्या मनावर कधीही न पुसले जाणारे घाव उमटले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती या गुन्हेगाराला मिळणाऱ्या कठोर शिक्षेची…











