Rahul Gandhi Kerala Leadership : केरळ विधानसभा (Kerala Legislative Assembly) निवडणुकीत काँग्रेसला बरंच समाधानकारक यश मिळालं. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला फारसं काही हाती लागलं नाही, पण केरळनं काँग्रेसला (Kerala Congress) थोडाफार ऑक्सिजन दिला. आता प्रश्न असा आहे की, मुख्यमंत्री कोण? आणि याच प्रश्नावर काँग्रेसचा नेहमीचा जुना आजार पुन्हा बाहेर आलाय. गटबाजी, लॉबिंग, दिल्ली दरबार आणि खुर्चीसाठी सुरू झालेली अंतर्गत रस्सीखेच. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी २३ मे ही अंतिम मुदत जवळ येतेय, पण मुख्यमंत्रीपदावर (Keral CM) अद्याप निर्णय नाही. म्हणजे निवडणूक जिंकली खरी, पण आता स्वतःच्याच घरातला वाद मिटत नाहीये. म्हणूनच सध्या राजकीय वर्तुळात एक वाक्य जोरात फिरतंय. काँग्रेसचं रडगाणं संपेना अन् केरळचा सेनापती ठरेना!
दिल्लीत सलग बैठका सुरू आहेत. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री निवडीवर चर्चा सुरू आहे. तीन-तीन तास बैठका होतात, पण निष्कर्ष शून्य. कारण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक एक-दोन नाहीत तर तब्बल तीन मोठे चेहरे मैदानात आहेत. त्यातलं पहिलं नाव म्हणजे के. सी. वेणुगोपाल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राहुल गांधींचे अत्यंत जवळचे मानले जाणारे नेते. दिल्ली हायकमांडमध्ये त्यांचा प्रभाव प्रचंड आहे. दुसरं नाव आहे रमेश चन्नीथला केरळच्या राजकारणातील जुना आणि अनुभवी चेहरा. तिसरं नाव म्हणजे व्ही. डी. सतिषन सध्याच्या काँग्रेसमधील आक्रमक आणि संघटनात्मक पकड असलेले नेते. आता खुर्ची एक आणि इच्छुक तीन मग भांडण तर होणारच.
हेही वाचा – केरळचा किल्लेदार कोण? दिल्लीत मोठ्या घडामोडी, ‘ही’ नावे चर्चेत…
काँग्रेसमध्ये गटबाजीचा जुना आजार
काँग्रेसमध्ये निवडणुकीपेक्षा मोठा प्रश्न असतो तो मुख्यमंत्री निवडीचा. कारण प्रत्येक गटाला आपला नेता वर हवा असतो. केरळमध्येही सध्या तेच सुरू आहे. एक गट वेणुगोपाल यांच्या बाजूने, दुसरा चेन्नीथला यांच्या बाजूने तर तिसरा सतीश यांच्या समर्थनात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे के.सी. वेणुगोपाल यांनी निवडणूकच लढवलेली नाही. तरीही त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येतंय. यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. “दिल्लीतील नेता थेट केरळवर लादला जाणार का?” असा प्रश्न स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते विचारत आहेत. रमेश चेन्नीथला यांनी हरिपाद मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. तर व्ही.डी. सतीश हे परवूर मतदारसंघातून निवडून आलेले आणि विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक भूमिका घेणारे नेते आहेत. त्यामुळे स्थानिक संघटनांमध्ये त्यांचं मोठं वजन मानलं जातं.
राहुल गांधींची अडचण काय?
राहुल गांधींसाठी ही निवडणूक फक्त मुख्यमंत्री निवडीची नाही, तर पक्षातील संतुलन राखण्याची परीक्षा आहे. एकाला मुख्यमंत्री केलं तर उरलेले दोन नाराज होणार. आणि काँग्रेसमध्ये नाराजी म्हणजे थेट गटबाजी आणि बंडखोरीची सुरुवात. वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री केल्यास “दिल्लीचा हस्तक्षेप” अशी टीका होऊ शकते. चेन्नीथला यांना संधी दिल्यास युवा नेतृत्व नाराज होऊ शकतं. आणि सतीश यांना मुख्यमंत्री केल्यास जुन्या गटाला धक्का बसू शकतो. म्हणजे कोणताही निर्णय घेतला तरी काँग्रेससाठी धोका आहे.
काँग्रेसचं यश की नव्या संकटाची सुरुवात?
खरं तर केरळमधील विजय काँग्रेससाठी आनंदाची बाब असायला हवी होती. पण आता मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळे त्या विजयावरच सावट आलं आहे. निवडणूक जिंकूनही जर सरकार स्थापनेत उशीर झाला, तर विरोधकांना काँग्रेसवर टीका करण्याची मोठी संधी मिळणार आहे. भाजप आणि डाव्या पक्षांकडून आधीच टोलेबाजी सुरू झाली आहे. “काँग्रेसला मुख्यमंत्रीच ठरवता येत नाही, राज्य काय चालवणार?” असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. काँग्रेसमध्ये शेवटचा शब्द दिल्ली हायकमांडचाच असतो. त्यामुळे अंतिम निर्णय काँग्रेस नेतृत्वाकडूनच होणार हे स्पष्ट आहे. पण हा निर्णय जितका उशिरा होईल, तितकी पक्षातील अस्वस्थता वाढत जाईल. २३ मेची मुदत जवळ येत असताना काँग्रेससमोर दोन मोठी आव्हानं आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री निवडणं अन् दुसरं पक्षातील नाराजी नियंत्रणात ठेवणं. सध्या तरी या दोन्ही आघाड्यांवर काँग्रेसची अवस्था “ना घर का, ना घाट का” अशी दिसतेय.
केरळमध्ये काँग्रेस जिंकली खरी, पण खरी लढाई आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी तीन दिग्गज नेते मैदानात उतरल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. दिल्लीतील बैठका, गटबाजी, लॉबिंग आणि नाराजी यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा स्वतःच्याच अंतर्गत राजकारणात अडकली आहे. आता पाहायचं इतकंचय की, केरळचा सेनापती कोण ठरणार? आणि तोपर्यंत काँग्रेसचं हे अंतर्गत रडगाणं थांबणार का?












