Hormuz Strait Update | मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची कसलीही चिन्हे अद्यापही दिसत नाहीयेत. अमेरिका (US) आणि इराणमधील (Iran) तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत (Hormuz Strait) अनेक देशांची जहाजे अडकून पडली आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून त्यांच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. अशातच आता भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारताच्या दोन जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली असून ते परत येत आहेत.
हेही वाचा – “रूपाली चाकणकर अन् खरातचा तो फोटो रॅडिसन ब्लूचा…”; दमानियांचं गौप्यस्फोट करणारं ट्विट, केला मोठा खुलासा
होर्मुझ ओलांडून दोन जहाजे भारतात दाखल
होर्मुझ सामुद्रधुनी पार करून दोन जहाजे भारतात दाखल झाली आहेत. ही दोन मोठी जहाजे एकूण 66,392 मेट्रिक टन स्वयंपाकाचा गॅस घेऊन भारतात परतली आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, भारतात आज आणखी एक जहाज दाखल होणार आहे. ‘सिमी’ असं या जहाजाचं नाव असून हे एलपीजी वाहक जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आज गुजरातच्या कांडला येथील दीनदयाळ बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. हे जहाज कतारच्या रास लाफान टर्मिनलवरून गॅस घेऊन निघाले होते. तर दुसरे जहाज ‘एनव्ही सनशाईन’, गुरुवारी सकाळी सुमारे 9.30 वाजता होर्मुझची सामुद्रधुनी पार करून गेले. हे जहाज देखील 18 मे पर्यंत नवीन मंगळुरू बंदरात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘सिमी’ हे जहाज 19,965 टन एलपीजी घेऊन 16 मे रोजी गुजरातच्या कांडला येथे पोहोचण्याची शक्यता आहे. तर व्हिएतनामचा ध्वज असलेले ‘एनव्ही सनशाईन’ हे जहाज संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) रुवैस रिफायनरीमधून 46,427 टन एलपीजी घेऊन निघाले असून ते 18 मे रोजी नया मंगळूर येथे पोहोचण्याची शक्यता आहे. दोन्ही जहाजांवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा (IOC) माल आहे.
या जहाजांबाबत बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले की, 13 मे रोजी ‘सिमी’ नावाच्या एलपीजी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली. तर 14 मे रोजी ‘एनव्ही संशान’नेही होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली आहे. मध्य पूर्वेत तणाव कायम असतानाच एलपीजी टँकरची ही हालचाल झाली आहे.












