CBSE 12th Scanned Copy :सीबीएसईने 12वीच्या स्कॅन कॉपी संदर्भात मोठा अपडेट दिला असून विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. 21 आणि 22 मे 2026 दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे स्कॅन कॉपीसाठी अर्ज करताना अनेक विद्यार्थ्यांकडून चुकीची फी कापली गेली होती. काही विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे कापले गेले, तर काहींकडून कमी शुल्क आकारण्यात आले होते.या प्रकरणी सीबीएसईने स्पष्ट केलं आहे की, ज्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कम कापली गेली आहे, ती रक्कम त्यांनी ज्या माध्यमातून पेमेंट केलं होतं त्याच माध्यमातून परत (रिफंड) केली जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून कमी शुल्क घेतलं गेलं आहे, त्यांना उर्वरित रक्कम भरण्याबाबत स्वतंत्रपणे माहिती दिली जाणार आहे.
Class XII Post-Result Process – Update for Students and Parents pic.twitter.com/6kRCzgGneq
— CBSE HQ (@cbseindia29) May 24, 2026
स्कॅन कॉपीसाठी नवीन अर्जाची गरज नाही
सीबीएसईने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर माहिती देताना सांगितलं की, अशा सर्व विद्यार्थ्यांना तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपी उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा फटका
उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या अनेक CBSE 12वीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या तीन दिवसांत तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता. अनेक विद्यार्थ्यांनी वेबसाइट चालत नसल्याची तक्रार केली होती. काही विद्यार्थ्यांनी पैसे कापले गेले, पण स्कॅन कॉपी मिळाली नाही अशीही तक्रार केली होती.याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारल्याचा दावा केला होता.
अर्जाची अंतिम मुदत तीनदा वाढवली
विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सीबीएसईने स्कॅन कॉपीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 19 मे रोजी वेबसाइट बंद पडल्यामुळे अर्जाची अंतिम तारीख 22 मेपर्यंत वाढवण्यात आली होती.मात्र समस्या कायम राहिल्याने नंतर ही तारीख 23 मे आणि त्यानंतर पुन्हा वाढवून 24 मे करण्यात आली.
शिक्षण मंत्र्यांनी मागवला अहवाल
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan यांनी या संपूर्ण प्रकरणी सीबीएसईकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. यामध्ये सर्व्हर डाऊन होणे, पेमेंट गेटवे फेल होणे आणि तांत्रिक अडचणींसंदर्भातील कारणांची माहिती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच पुनर्मूल्यांकन प्रक्रियेचे व्यवस्थापन करणाऱ्या एजन्सींची जबाबदारी निश्चित करण्याबाबतही स्पष्टीकरण मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.






