Jay Pawar Pune MLA : महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) पटलावर गेल्या काही वर्षांत अनेक अभूतपूर्व उलथापालथी आणि सत्तासंघर्ष पाहायला मिळाले आहेत. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी नेहमीच पवार हे नाव राहिले आहे. आता याच पवार कुटुंबातील तिसऱ्या-चौथ्या पिढीतील आणखी एक तरुण चेहरा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) यांच्या राजकीय लाँचिंगची (Political Launch) चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने खुद्द जय पवार यांनी दिलेल्या थेट संकेतानंतर, त्यांच्या समर्थकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या वादळी पोस्टरबाजीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी सुरू झाली आहे.
हेही वाचा – ‘जनतेच्या खिशावर डल्ला मारणे हा BJPचा मुख्य अजेंडा’; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर एक विशिष्ट पोस्टर प्रचंड वेगाने शेअर केले जात आहे. या पोस्टरने केवळ बारामतीचेच नव्हे, तर मुंबई आणि पुण्याच्या राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरवर जय अजितदादा पवार असा ठळक उल्लेख करण्यात आला असून, त्यावर छापण्यात आलेले मजकूर अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी राजकीय रणनीतीचा भाग म्हणून तयार केल्याचे दिसून येते. या पोस्टरवर प्रामुख्याने दोन मोठ्या घोषणा किंवा टॅगलाईन्स लिहिण्यात आल्या आहेत. पहिली टॅगलाईन आहे, नवे विचार नवी दिशा महाराष्ट्रासाठी. या घोषणेतून जय पवार हे केवळ बारामती पुरते मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी प्रगतीशील दिशा देण्यास सक्षम असणारे नेतृत्व आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
तरुणाईच्या आकांक्षांचा एक नवा चेहरा म्हणून जय पवार यांना प्रोजेक्ट
दुसरी महत्त्वाची टॅगलाईन म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा संकल्प. या संकल्पनेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाचा, आधुनिकतेचा आणि तरुणाईच्या आकांक्षांचा एक नवा चेहरा म्हणून जय पवार यांना प्रोजेक्ट केले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते अशा प्रकारची पोस्टरबाजी ही कधीही उत्स्फूर्त नसते, तर त्यामागे पक्षाची किंवा नेत्याची छुपी संमती असते. जेव्हा एखाद्या तरुण नेत्याला मोठ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे असते, तेव्हा त्याआधी जनमानसात आणि विशेषतः तरुणांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू व्हावी, यासाठी अशा गोष्टी आखल्या जातात. जय पवार यांच्या फॅन पेजेस आणि कार्यकर्त्यांच्या अकाऊंटवरून शेअर होणारे हे पोस्टर्स म्हणजेच त्यांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग मानला जात आहे.
मी स्वतः उमेदवार असावं, अशी स्थानिक लोकांची, जनतेची आणि माझ्या समर्थक कार्यकर्त्यांची इच्छा
पत्रकारांनी जेव्हा त्यांना थेट प्रश्न विचारला की, आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार का? यावर जय पवार यांनी अत्यंत परिपक्वपणे पण स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले, २०२९ च्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः उमेदवार असावं, अशी स्थानिक लोकांची, जनतेची आणि माझ्या समर्थक कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यांच्या या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळबळ उडवून दिली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या या इच्छेला कुठेही नकार दिला नाही किंवा ही शक्यता फेटाळून लावली नाही, उलट लोकांच्या इच्छेचा आदर करण्याचे संकेत दिले. यामुळे जय पवार २०२९ मध्ये अधिकृतपणे निवडणूक लढवणार, यावरही जवळपास आत्ताच शिक्कामोर्तब झाले आहे.












