Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • विदर्भ होरपळला! 500 वटवाघुळांचा जीव गेला; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
ताज्या बातम्या

विदर्भ होरपळला! 500 वटवाघुळांचा जीव गेला; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Bat Deaths Vidarbha
54

Bat Deaths Vidarbha: विदर्भात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांसह वन्यजीवांचेही हाल होत आहेत. एक नाही, दोन नाही तर तब्बल 500 वटवाघुळांचा जीव गेला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून नागरिकांसह वन्यजीवांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा परिसरात तब्बल 500 वटवाघुळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून पर्यावरणप्रेमींकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

उष्माघातामुळे मृत्यूचा प्राथमिक अंदाज

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिरोंचा येथील वन विभागाच्या परिसरातील झाडांवर मोठ्या प्रमाणात वटवाघुळे वास्तव्यास होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे आणि पाण्याअभावी ही वटवाघुळे मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही मृत वटवाघुळांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा: IPL vibe की म्युझिक शो? गूगलच्या डूडलने नेमकं काय सूचित केलं?

विदर्भात तापमानाने गाठला उच्चांक

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. ब्रह्मपुरी येथे 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ते देशातील सर्वाधिक तापमान ठरले. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया आणि अकोला येथेही प्रचंड उकाडा जाणवत आहे.

हवामान विभागाने अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर नागपूर आणि अकोला जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पाण्याअभावी वन्यजीव संकटात

स्थानिक नागरिकांनी जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप केला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी उपाययोजनांची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षी आणि प्राणी उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत.

वाघाच्या हल्ल्यामागेही उष्णतेचं कारण?

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला होता. या भागातही तापमान 47 अंशांच्या पुढे गेले होते. उष्णतेमुळे वाघ अस्वस्थ आणि आक्रमक झाला असावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तज्ञांच्या मते, तीव्र उष्णतेमुळे प्राण्यांमध्ये चिडचिड आणि तणाव वाढू शकतो. पाण्याची कमतरता असल्यास त्यांचा स्वभाव अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते.

प्रशासनाकडून नागरिकांना सूचना

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भातील वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts