Ferrari Luce Lunch: जगभरातील सुपरकार चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. इटलीची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी Ferrari ने अखेर आपल्या पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक सुपरकारचे अनावरण केले आहे.
लक्झरी आणि सुपरफास्ट कारसाठी ओळखली जाणारी इटलीची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी Ferrari आता इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत उतरली आहे. कंपनीने रोममध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक सुपरकार ‘फेरारी लुचे’ सादर करत ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी घोषणा केली.
हेही वाचा: लग्नाच्या १० वर्षांनी दिव्यांका त्रिपाठी झाली दोन मुलांची आई; म्हणाली – ‘माझे करण अर्जुन आले’
पारंपरिक पेट्रोल इंजिनपासून पुढे जात फेरारीने अत्याधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञान स्वीकारले असून, ही कार कंपनीच्या भविष्यातील नव्या धोरणाचे प्रतीक मानली जात आहे.

स्पीड आणि जबरदस्त पॉवर
‘लुचे’मध्ये चार स्वतंत्र इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत, ज्या प्रत्येक चाकावर स्वतंत्र नियंत्रण ठेवतात. या सेटअपमुळे कारची एकूण ताकद तब्बल १,०५० हॉर्सपॉवरपर्यंत पोहोचते.
ही सुपरकार केवळ 2.5 सेकंदांत 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते, तर 200 किमी प्रतितास वेगासाठी तिला 6.8 सेकंद लागतात. कंपनीच्या दाव्यानुसार, कारचा कमाल वेग 310 किमी प्रतितासपेक्षा जास्त आहे.
एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 530 किमीपेक्षा अधिक अंतर सहज पार करू शकते.

फेरारीत पहिल्यांदाच मिळणार 5-सीटर
‘लुचे’ ही केवळ इलेक्ट्रिक कार नाही, तर फेरारीसाठी एक मोठा बदल आहे. या मॉडेलमध्ये पहिल्यांदाच चार दरवाजे आणि पाच जणांसाठी आसनव्यवस्था देण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्ममुळे केबिन अधिक प्रशस्त बनवण्यात आला असून, लक्झरीसोबतच आरामालाही प्राधान्य देण्यात आले आहे.
प्रीमियम डिझाईन आणि हायटेक इंटिरियर
या कारच्या डिझाईनसाठी फेरारीने ‘लव्हफ्रॉम’ या प्रसिद्ध डिझाईन टीमची मदत घेतली आहे. अॅपलचे माजी डिझायनर सर जोनी इव्ह आणि मार्क न्यूसन यांच्या मार्गदर्शनाखाली कारचा आधुनिक आणि आकर्षक लूक तयार करण्यात आला आहे. या कारमध्ये OLED डिस्प्ले, 21 स्पीकर्सची प्रीमियम साउंड सिस्टीम आणि अत्याधुनिक डिजिटल फीचर्स देण्यात आले आहेत.

20 मिनिटांत फास्ट चार्जिंग
‘लुचे’मध्ये 350kW DC फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. योग्य चार्जिंग सुविधेमध्ये ही कार अवघ्या 20 मिनिटांत मोठ्या प्रमाणात चार्ज होऊ शकते.
याशिवाय, कारच्या विविध इलेक्ट्रिक घटकांवर 8 वर्षांची वॉरंटी आणि 7 वर्षांची मोफत देखभाल सुविधा देऊन फेरारीने ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.





