Sunetra Pawar flight technical glitch : चार महिन्यांपूर्वी बारामतीत एक विमान अपघात झाला आणि महाराष्ट्रानं आपला लाडका दादा गमावला, कार्यकर्त्यांचे अश्रू अजूनही सुकले नाही, तोपर्यंत मुंबईतून एक अशी बातमी समोर आली, ज्यानं कार्यकर्त्यांना पुन्हा काळजी वाटू लागली, कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली प्रवासादरम्यान मुंबई विमानतळावर त्यांच्या खाजगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. ९ जून २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही बातमी समोर आल्याने अनेक चर्चांना उधाण आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीतील एका महत्त्वाच्या राजकीय बैठकीसाठी मुंबईहून रवाना होणार होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे महायुतीचे दिग्गज नेतेही या विमानात होते. संध्याकाळी ५ वाजता हे विमान मुंबई विमानतळावरून दिल्लीसाठी झेपावणार होते. सर्व नेते विमानात बसले होते आणि उड्डाणाची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, ऐन उड्डाणापूर्वी वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा तांत्रिक बिघाड लक्षात आला. विमानाने धावपट्टीवर जाण्यापूर्वीच या बिघाडाची माहिती मिळाल्याने वैमानिकाने सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण त्वरित थांबवण्याचा निर्णय घेतला. या अनपेक्षित बिघाडामुळे विमान तब्बल दोन तास मुंबई विमानतळावरच उभे होते.
‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीचे विमान
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि समाज माध्यमांवर चर्चा सुरू झाली की हे विमान ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीचे आहे. ही चर्चा सुरू होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला होता, ते विमान व्हीएसआर कंपनीचेच होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विमानातही बिघाड झाल्याचे समजताच लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुनेत्रा पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट केले की, ज्या विमानात बिघाड झाला ते विमान ‘व्हीएसआर’चे नसून ‘सीएमआर’ म्हणजेच चार्टर मॅनेज्ड रिसोर्सेस या कंपनीचे होते. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, हा एक अतिशय छोटा तांत्रिक बिघाड होता आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही जोखीम पत्करायची नसल्याने दुरुस्ती होईपर्यंत उड्डाण थांबवण्यात आले होते.
घटनेनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडून स्पष्टीकरण
अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबाने विमान प्रवासाबाबत विशेष खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी तर आपल्या आईच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, यापुढे कधीही व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करायचा नाही. अजित पवारांच्या अपघातावेळी अनेक तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप झाले होते, ज्यामुळे त्या कंपनीबद्दल कुटुंबाच्या मनात साशंकता होती. ९ जूनच्या घटनेतही सुरुवातीला व्हीएसआरचे नाव आल्याने कार्यकर्त्यांमध्ये घबराट होती, परंतु सुनेत्रा पवारांच्या स्पष्टीकरणानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.












