Rohit Pawar Hunger Strike Protest : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शेतकऱ्यांची सरसकट व विनाअट कर्जमाफी (Blanket and unconditional loan waiver) करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १२ जून २०२६ पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन (Hunger strike / Fasting protest) सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. सरकारकडून त्यांना चर्चेसाठी निमंत्रण (Invitation for discussion) देण्यात आले आहे. मात्र, रोहित पवार आंदोलन करण्यासाठी ठाम भूमिकेवर आहेत.
सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचे जाहीर केले आहे. मात्र, २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी फक्त ५० हजार रुपयांपर्यंतच मर्यादित राहील, अशी जाचक अट घालण्यात आल्याने सुमारे ३६ लाखांहून अधिक शेतकरी या योजनेच्या फायद्यापासून वंचित राहतील, असा दावा रोहित पवार यांचा आहे. रोहित पवार म्हणाले, “सरकारने केलेली कर्जमाफी नव्हे तर फसवणूक आहे. २०१९ च्या लाभार्थ्यांना ५० हजार देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. आज अजित दादा असते तर असा जीआर निघाला नसता.”
हेही वाचा – जळगाव विधान परिषदेचे बंड अखेर षंड, शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर रेश्मा काळेंची माघार
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणून उपमा
आंदोलनावर टीका करणाऱ्या मंत्र्यांना रोहित पवार यांनी जोरदार टोला लगावला. मंत्री जयकुमार गोरे यांनी आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हटल्यावर रोहित पवार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणारे मंत्र्यांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही. पालकमंत्र्यांना जीआर तरी वाचता येतो का?” असा प्रश्न उपस्थित केला. “माझा बीपी व्यवस्थित आहे, मात्र शुगर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.” तरीही ते आंदोलन मागे घेणार नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीतील जाचक अटी शासनाने घातल्या आहेत. त्या मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.
अल्टिमेटम आणि पुढील भूमिका
रोहित पवार यांनी सांगितले, “आज अल्टीमेटम देत नाही, मात्र उद्या १४ जून रोजी सरकारला अल्टीमेटम देईन.” शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फसवेपणा समजत आहे. कुठे काही झाले तर सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिलाय. त्यांनी सरकारच्या योजनेची तुलना “मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला बैल आजारी होता, त्याप्रमाणे ही कर्जमाफीही आजारी आहे,” अशी खरमरीत टीका केली.
कृषीमंत्र्यांकडून चर्चेसाठी निमंत्रण
कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे. प्रशासनाकडूनही चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, “मागण्यांवर ठोस विचार झाल्याशिवाय माघार नाही. आम्हीही जिद्दी आहोत.” हे आंदोलन विठ्ठल मंदिराजवळील ऐतिहासिक ठिकाणी सुरू असल्याने त्याला धार्मिक आणि नैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रोहित पवार यांनी आंदोलन सुरू करताना शेतकऱ्यांच्या हातांना सर्व धर्म-जातीचा स्पर्श असल्याचे सांगत विठुरायाच्या आशीर्वादाने हे आंदोलन सुरू केल्याचे म्हटले.












