Ketan Agrawal Murder Case: लोहगड परिसरात ४०० फूट दरीत केतन अग्रवाल यांना त्यांच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल आणि तिच्या मित्रांनी ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोघांना आज वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पुण्यातील उद्योजकाच्या मुलगा केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणात आज महत्वाची घडामोड होणार आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपत असून, त्यांना आज वडगाव न्यायलयात हजार करण्यात येणार आहे. पुढील तपासासाठी पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: गिरगावतील हॉटेलवर छापा; संशयित देहव्यापार रॅकेट उघड, ‘या’ अभिनेत्रीला रंगेहात पकडले
केतनला दरीत ढकलल्याचा आरोप
या प्रकरणाच्या तपासदरम्यान पोलिसांनी आरोपींवर कट रचून केतनला दरीत ढकलल्याचा आरोप केला आहे. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, तपासात मिळालेल्या पुरावे, साक्षी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
क्राइम सीन रिक्रिएशन
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी काल २८ जून रोजी आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना (क्राइम सीन रिक्रिएशन) केली. या वेळी घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आज न्यायालयात सुनावणी
आज २९ जून रोजी न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींना पुढील पोलीस कोठडी द्यायची की न्यायालयीन कोठडीत पाठवायचे, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, तपासातील पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
केतन विशाल अग्रवाल आपल्या होणाऱ्या पत्नी सिया गोयलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) गेला होता. ट्रेकिंगदरम्यान दोघे दरीच्या कडेला फोटो काढत असताना ही घटना घडल्याचा प्रारंभिक अंदाज होता.
मात्र, घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. पुढे सियाच्या मोबाईलमधील डेटाचा अभ्यास केल्यानंतर हा प्रकार अपघात नसून संशयास्पद असल्याचे संकेत मिळाल्याचे तपासात समोर आले.
दरम्यान, पोलिस चौकशीत सियाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेमागे वैयक्तिक वाद आणि नियोजनाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तिचा आणि चेतन चौधरी यांचा सहभाग असल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे. या माहितीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.










