Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये काही आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षातील या कथित नाराजीमागे नेमकं कारण काय आहे आणि कोणत्या मुद्द्यावरून अस्वस्थता निर्माण झाली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) काही आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षाकडून देण्यात आलेल्या काही सूचनांमुळे आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, यामुळे नव्या राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
जयंतीच्या तयारीदरम्यान वादाची ठिणगी
२२ जुलै रोजी दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती राज्यभर विविध कार्यक्रमांद्वारे साजरी करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आणि पदाधिकाऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. राज्यभर एकसारखी छायाचित्रे, बॅनर आणि प्रचार साहित्य वापरण्यावर भर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जिओ टॅगिंगच्या सूचनांवर चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे छायाचित्रांसह जिओ-टॅगिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेबाबत काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असून, अशा प्रकारच्या नियंत्रणात्मक सूचनांची आवश्यकता काय, असा प्रश्न पक्षांतर्गत उपस्थित केला जात असल्याचे समजते.
नाराजीची चर्चा, मात्र अधिकृत भूमिका नाही
या घडामोडींमुळे पक्षात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असल्या, तरी याबाबत पक्षाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच आमदारांनीही सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त केलेली नाही.
राजकीय चर्चाना उधाण
एकीकडे राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांबाबत विविध तर्क- वितर्क सुरू असताना, दुसरीकडे पक्षातील या कथित नाराजीकडे चर्चेमुळे वातावरण आणखी तापले आहे. आगामी काळात पक्ष नेतृत्व या विषयावर काय भूमिका घेते आणि या चर्चांवर पडदा कसा पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












