Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी (Antarwali Sarati Protest) येथे आजपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल होऊ लागले आहेत. आंदोलनस्थळी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
उपोषणाला सुरुवात करताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढा सुरू असल्याचे सांगत, गोरगरीब मराठा कुटुंबातील मुलांच्या भवितव्यासाठी समाजातील प्रत्येकाने या लढ्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा: मराठा समाजासाठी मोठी अपडेट! जिल्हाधिकाऱ्यांचा थेट आदेश; प्रमाणपत्रासाठी खास व्यवस्था
मराठ्यांच्या लेकरांसाठी अंतरवालीत या
जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना (Maratha Community) अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati Protest) येण्याचे आवाहन केले. “गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या पाठीवर हात ठेवा. त्यांच्या भविष्यासाठी उभे राहा,” असा संदेश त्यांनी समाजाला दिला.
हे आंदोलन निर्णायक असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक मराठ्याने आपल्या घराबाहेर पडून आंदोलनाला ताकद द्यावी, असे आवाहन केले. आंदोलनात कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ शकतो, त्यामुळे गाफील राहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
५८ लाख नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राची मागणी (58 Lakh Kunbi Records)
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्यात सापडलेल्या सुमारे ५८ लाख नोंदींच्या आधारे पात्र मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी प्रवर्गातील कुणबी जातप्रमाणपत्र (Maratha OBC Demand) देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतही सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. केवळ नोंदी सापडल्याचे सांगण्यापेक्षा त्यावर आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी (Satara Gazette)
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातारा गॅझेट तातडीने लागू करण्यात यावे, अशी मागणीही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली. तसेच जात पडताळणी समिती कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आरक्षणाच्या प्रक्रियेत मराठा समाजाला अडचणी निर्माण करणाऱ्या बाबींवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी घेतली.
आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरीची मागणी
मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांनाही जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांमध्ये स्थान दिले आहे. संबंधित कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अन्न-पाण्याविना उपोषण करतोय (Manoj Jarange Hunger Strike)
आपल्या मागण्यांसाठी आपण अन्न आणि पाण्याविना उपोषण (Manoj Jarange Hunger Strike) करत असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने या आंदोलनाची आणि मराठा समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी मराठा समाजाला सावध राहण्याचा सल्ला देत, “आपल्यावर वेळोवेळी डाव टाकला जातो. कोणत्याही जाळ्यात अडकू नका,” असा इशारा दिला.
जरांगे पाटील अजित दादांची आठवण आल्याने भावुक
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली. अजित पवार यांच्याबाबत बोलताना त्यांनी भावनिक सूरही व्यक्त केला.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अंतरवाली सराटीत राज्यभरातून मराठा बांधव दाखल होत असताना, सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते आणि मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील हे जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता
दरम्यान, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. या संभाव्य भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, सरकार आणि आंदोलकांमध्ये तोडगा निघतो का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.









