Dharmendra Pradhan: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांनी संसदेकडे मोर्चा नेण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला जंतरमंतरऐवजी सुमारे एक किलोमीटर अंतरावरील केरळ भवनपर्यंतच परवानगी दिली. या निर्णयामुळे आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आणि पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
हेही वाचा: मध्यरात्री बॅरिकेड्स हटवले, सुरक्षा वाढली; जंतरमंतरवर मध्यरात्री नेमकं काय घडलं?
परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शीघ्र कृती दलाच्या (RAF) जवानांना घटनास्थळी तैनात करण्यात आले. आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखताना पोलिसांनी लाठीमार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जंतरमंतर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडी सुरू असतानाच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. धर्मेंद्र प्रधान शाह यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.









